सीना–माढा व खैराव–मानेगाव उपसा सिंचन योजनांना गती; मंत्रालयातील बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक
आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; सीना–माढा सिंचन योजनेतील ७ गावांच्या समावेशासह महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय
मुंबई | माढा | ज्ञानप्रवाह न्यूज | दि. १० जुलै २०२६ : माढा तालुक्यातील सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या सीना–माढा उपसा सिंचन योजना आणि खैराव–मानेगाव उपसा सिंचन योजना संदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जलसंधारण व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.

आमदार अभिजीत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे झालेल्या या बैठकीत सीना–माढा उपसा सिंचन योजनेत तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगाव (खे.), कुर्डू, अंबाड आणि पिंपळखुटे या सात गावांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच सुमारे २० वर्षे जुन्या झालेल्या मोटारी बदलून नवीन मोटारी बसविणे, सीना नदीच्या बोगद्यात नियोजनबद्ध पाणी सोडणे, खैराव–मानेगाव उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करणे, संपादित जमिनीवरील फळझाडांच्या प्रलंबित नुकसानभरपाईचे वितरण तसेच नदीकाठावरील विद्युत व्यवस्था सुरळीत करण्याच्या मागण्या मांडण्यात आल्या.

बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच दोन्ही सिंचन योजनांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीस आमदार नारायण पाटील, भारत शिंदे, अमोल गायकवाड, विजय भगत, शरद मोरे, प्रकाश चोपडे, राजाभाऊ भांगिरे, संजय भोंगे, राजू भानवसे, गणेश गुंडगिरे, बंडू घाडगे, अजिंक्य काटकर, बालाजी टोणपे, रामकृष्ण चोपडे, बाळासाहेब चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

