डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलित-सवर्ण ऐक्याचे मिशन पूर्ण करूया : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन उत्साहात; ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार-२०२६’ प्रदान
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज | दि. ९ जुलै २०२६ : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पीईएसचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक समता, शिक्षण आणि दलित-सवर्ण ऐक्याचे विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत एक मजबूत राष्ट्र म्हणून उभा राहण्यासाठी सामाजिक विषमता आणि जातीभेद दूर होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी नदीजोड प्रकल्प, धरणे, अर्थव्यवस्था, संविधान आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांतील डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचाही उल्लेख केला.
कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानत बहुजन समाजाला दिलेल्या शिक्षणाच्या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यावेळी रामदास आठवले यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाबाबत धर्मादाय आयुक्त, उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्णयांचा उल्लेख करत आपणच संस्थेचे अधिकृत अध्यक्ष असल्याचे सांगितले. तसेच स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्यासाठी राज्यपालांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंना निर्देश द्यावेत,अशी मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार -२०२६ विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना प्रदान करण्यात आला.यामध्ये विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ निलमताई गोऱ्हे, पद्मश्री अशोक (आबा) खाडे, डॉ. विनय राऊत, डॉ. रमेश खानविलकर, नंदकुमार गोंधळी, डॉ. किसन पवार, विजय मोहिते, नागसेन कांबळे, डॉ. विष्णु भंडारे आणि डॉ. विजय मोरे यांचा समावेश होता.

या कार्यक्रमास डॉ.वासुदेव गाडे, पद्मश्री उज्ज्वल निकम, ॲड. बी. के. बर्वे, अरविंद सोनटक्के, डॉ. वेंकटस्वामी, भदंत राहुल बोधी, चंद्रशेखर कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

