मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत
आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना
मुंबई,दि.3 : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन आदी सर्वांनी समन्वयाने यासाठी कामकाज करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास खुला ठेवावा, याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे सनियंत्रण करावे, स्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभे करावेत, त्यांना कपडे, अन्न शुद्ध पाणी, औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पाटबंधारे विभाग, हवामान खाते यांच्याशी समन्वय ठेवून लोकांना आवश्यक माहिती त्वरित द्यावी. आपदग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावेत. त्याचबरोबर पाऊस परिस्थिती, बाधित क्षेत्र, धरणांमधील पाणी पातळी, स्थलांतरित लोकांची संख्या, झालेल्या नुकसानीची माहिती इत्यादी माहिती त्वरित वेळोवेळी सादर करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------