रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप जारी; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे गंभीर आरोप


हायलाइट्स:

  • कोकणात पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप
  • राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने साधला शिवसेना नेत्यावर निशाणा
  • रामदास कदम यांच्याविरोधातील पुरावे पक्षाच्या नेत्यांकडे दिल्याचा दावा

खेड :शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आमदार रामदास कदम यांच्यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि विद्यमान मंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनीच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला.

खेडचे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि माजी आमदार संजय कदम यांची संयुक्त पत्रकार परिषद आज शनिवारी खेड येथे आयोजित करण्यात आली होती. इतकंच नाही तर त्यांनी पुराव्यासाठी मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिपच पत्रकार परिषदेत सादर केली आहे. ‘आमच्या महाविकास आघाडीत काही सुर्याजी पिसाळ तयार झाले आहेत. तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच पुरवली,’ असा आरोप माजी आमदार संजय कदम पत्रकार परिषदेत केला.

नीलेश लंकेंच्या घरी जाऊन शरद पवारांनी दिला मोठा राजकीय संदेश

‘आमची भूमिका ही कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या बाजूने आहे. रामदास कदम आणि पालकमंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यात वाद असतील तर त्यांनी परस्पर ते बघावे. मात्र यांच्या वादाचा त्रास आमच्या पर्यटन व्यवसायिकांना होत आहे. ही कोकणातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही,’ असा इशारा यावेळी संजय कदम यांनी दिला. ‘जो प्रसाद कर्वे माहितीचा अधिकार वापरून बाकी गोष्टी करत असेल आणि रामदास कदम त्याचा उपयोग यासाठी करत असतील तर तो कर्वे त्यांनाही भविष्यात भारी पडेल. त्याने मोबाईलवर कॉल रेकॉर्डिंग सुरू ठेवून रामदास कदम यांना कॉल केला, याचा अर्थ स्पष्ट आहे,’ असं कदम यांनी सांगितले.

‘सगळे पुरावे नेत्यांकडे दिले’

‘महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचं काम माजी मंत्री आणि विधानपरिषदचे आमदार रामदास कदम करत आहेत, आम्ही या सगळ्याचे पुरावे आमच्या नेत्यांकडे दिले आहेत,’ अशीही माहिती दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी दिली.

मनसेने काय भूमिका घेतली?

‘किरीट सोमय्या यांची जर पुन्हा वक्रदृष्टी पडली तर आम्ही त्यांना रोखू,’ असा इशारा मनसेचे कोकण विभागीय संघटक नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिला आहे. कोकणाबाबत हे अत्यंत खालच्या थराचे राजकरण सुरु आहे असून याचा जाब कोकणातील जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, असंही खेडेकर यांनी म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: