lakhimpur case : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी २ जणांना अटक, केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा सापडेना
लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आज दोन जणांना अटक केली. लवकुश राणा आणि आशिष पांडे अशी त्यांची नावं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हो दोन्ही आरोपी आशिष मिश्रा याच्या जवळचे असल्याचं सांगण्यात येतंय. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एका गाडीत हे दोघेही होते, अशी माहिती लखीमपूर पोलिसांनी दिली. आता पोलिस या दोघांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या घरावर नोटीस लावली आहे. आशिष मिश्राने उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाली १० वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात हजर व्हावं, असं पोलिसांनी नोटिसमध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्रा याच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. शेतकऱ्यांना चिरडताना आशिष मिश्रा हा गाडी चालवत होता. तसंच गाडीतून उतरल्यानंतर आशिष मिश्राने गोळीबार केला आणि तो पळाला, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. IANS ने हे वृत्त दिलं आहे.
यूपी पोलिसांनी नेमली ९ अधिकाऱ्यांची चौकशी समिती
उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक मुकुल गोयल यांनी ९ पोलिस अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती नेमली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) या चौकशी समितीचे नेतृत्व करतील. DIG उपेंद्र अग्रवाल यांच्यासोबतीला पोलिस अधीक्षक सुनील कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरुण कुमार सिंह, दोन विभागीय पोलिस अधिकारी, तीन पोलिस निरीक्षक आणि एक पोलिस उपनिरीक्षक असेल. यूपीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, लखीमपूर खिरीमधील हिंसाचार घटनेचा नवा व्हिडिओ बुधवारी समोर आला आहे. या हिंसाचारात तीन कार सामील असल्याचं आहेत. यात एक कार भरधाव वेगाने येत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाताना दिसतेय आहेत. तिच्या मागे दोन कार जाताना दिसत आहेत.
दुसरीकडे, लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं आहे. तसंच या प्रकरणी कोणाविरोधात एफआयआर दाखल झाला आहे? आणि किती जणांना अटक केली आहे? याचा सद्यस्थिती अहवाल शुक्रवारी म्हणजे उद्या सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी पोलिस इतर आरोपींचा शोध घेत असून छापेमारी सुरू आहे. पण केंद्रीय मंत्र्यांचा मुलचा अद्याप शोध लागलेला नाही, असं अधिकाऱ्याने सांगितलं.