हजारो बौद्ध बांधवांना घेऊन मनसेची धम्मयात्रा नागपूरकडे रवाना
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने धम्म यात्रेचे आयोजन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यावतीने नागपूर दीक्षाभूमी येथे धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.ही धम्म यात्रा रविवारी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील हजारो बौद्ध बांधवांना घेऊन पंढरपूर येथून नागपूरकडे रवाना झाली.

या धम्म यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील सारनाथ बुद्ध विहार येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्रिसरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करून करण्यात आली.

भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आपल्या लाखो अनुयायांना सोबत घेऊन नागपूर येथील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून बौद्ध समुदायामध्ये महत्त्वपूर्ण आणि आदरणीय मानला जातो.

तेव्हापासून १४ ऑक्टोबर रोजी देशभरातील लाखो बौद्ध बांधव नागपूर येथील दीक्षाभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जातात. या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या धम्म यात्रेत पंढरपूर-मंगळवेढा विधान सभा मतदार संघातील हजारो बौद्ध बांधवांनी सहभाग नोंदवून नागपूरकडे रवाना झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी विविध यात्रेंचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अजमेर शरीफ यात्रा, आयोध्या वारी यानंतर आता धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूर मनसे धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.


