मला कल्पना नाही; राहुल द्रविडच्या नियुक्तीवर विराटचे धक्कादायक उत्तर


दुबई (यूएई): भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांच्या नियुक्तीची कल्पना नाही. तो म्हणतो, ‘मी आणि सध्याचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गेल्या काही वर्षांत टीम इंडियात जी सर्वोत्तम संस्कृती रुजवली आहे, त्याचा मला अभिमान आहे. दिवसागणिक आपल्यातील सर्वोत्तमाचा ध्यास घेत प्रगती करायची, हा भारतीय संघाचा मूलमंत्र आहे’. शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) टी-२० वर्ल्ड कपच्या निमित्ताने कर्णधारांचा संवाद आयोजित केला होता. त्यात विराटने हे विधान केले.

‘हे बघा टी-२० वर्ल्ड कप जिंकणे हे आमचे ध्येय आहे. प्रशिक्षक निवडीबाबत सध्या काय सुरू आहे त्याबद्दल मला कल्पना नाही. आम्हा कुणाचीच याबाबत कुणासोबतही सखोल चर्चा वैगरे झालेली नाही. गेल्या पाच, सहा वर्षांत आम्ही संघात जी संस्कृती निर्माण केली आहे ती कोणतेही जेतेपद आणि स्पर्धेच्याही पलीकडील आहे’.

आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची सलामी २४ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आहे. त्याआधी भारतीय संघ सरावसामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.

‘धोनीमुळे आत्मविश्वास दुणावेल’

आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून धोनीची नियुक्ती झाली आहे. त्याची उपस्थिती संघाचा आत्मविश्वास दुणावणारी ठरेल, असे विराटला वाटते. ‘धोनीचे व्यावहारिक सल्ले, लहान, सहान गोष्टींवरील करडा कटाक्ष आणि त्याची उपस्थिती आम्हाला फायद्याची ठरणार आहे. धोनीकडे दांडगा अनुभव असून तो स्वतःदेखील या जबाबदारीमुळे खूष आहे. धोनी कायमच आम्हा सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरला आहे. आपल्या कारकिर्दीत प्रथमच वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेला सामोरे जाणाऱ्या युवा खेळाडूंना धोनीच्या सहवासाचा खूप फायदा होईल’, असे विराट म्हणाला.

‘पाकविरुद्धची लढत इतर लढतींसारखीच’

भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सलामीची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तिकिटे संपली, उत्सुकता, विजय कुणाचा? असे विषय सतत चर्चेत आहेत मात्र विराटला पाकिस्तानविरुद्धचा हा सामना इतर लढतींसारखाच वाटतो. अलीकडेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही, ‘यंदा आम्ही भारताला हरवूच’, असे म्हटले होते. याबाबत विराटची प्रतिक्रिया असते : ‘भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांची मागणी, विक्री यापासून लढत कोण जिंकणार, याबाबत सतत चर्चा केल्याने या सामन्याला वलय प्राप्त होते. मात्र मी या लढतीला इतर लढतींप्रमाणेच सामोरा जाणार आहे. काही मित्रांनी मलाच या सामन्याच्या तिकिटांची विचारणा केली होती. मी थेट नकार दिला. मी असे ऐकले आहे की, या तिकिटांची किंमत आता गगनाला भिडली आहे’, असे विराट म्हणाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: