शिवसेनेत मतभेद? ठाण्यात रामदास कदमांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी


हायलाइट्स:

  • भाजपच्या नेत्यांना रसद पुरवल्याच्या आरोपामुळे रामदास कदम वादात
  • दसरा मेळाव्यातही कदम यांची अनुपस्थिती
  • रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठाणे शहरात बॅनर

ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपच्या नेत्यांना रसद पुरवल्याच्या आरोपामुळे शिवसेना नेते रामदास कदम वादात अडकले आहेत. कथित ऑडिओ क्लिपमुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवल्याने दसरा मेळाव्यातही कदम यांनी अनुपस्थिती होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर नसल्याचं कारण कदम यांनी दिलं. मात्र दसरा मेळाव्यानंतर रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठाणे शहरात बॅनर झळकावण्यात आले आहेत.

‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक…आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो बाप बापच असतो’ या अशयाचा मजकूर असलेला बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी चौकात लावण्यात आला आहे. शिवसेना पक्षाचा बॅनरवर उल्लेख नसला तरी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे या बॅनरवर फोटो लावण्यात आले आहे.

‘फडणवीसांनी पुरावे सादर करावे’; प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान

रामदास कदम यांच्या फोटोमागे डरकाळी फोडणाऱ्या वाघाचे चित्र लावण्यात आले आहे. कट्टर समर्थक विठोबा कदम आणि रविशेठ आमले या दोघांचे फोटो आणि नावे या बॅनरवर आहेत.

कोकणचा ढाण्यावाघ असा उल्लेख करून त्यावर लिहिलेल्या मजकुरावरून ठाण्यात चर्चेला उधाण आलं आहे. यामध्ये उल्लेख केलेले राडा झाल्यानंतर फोन करणारे आणि सुपारी देणारी मंडळी नेमकी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा बॅनर नेमका कोणाला उद्देशून लिहण्यात आला आहे? या बद्दलही कुतुहल निर्माण झालं आहे.

दरम्यान, या संदर्भात बॅनरवरील रवी आमले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सामान्य शिवसैनिक असल्याचं स्पष्ट केलं. विरोधकांकडून रामदास कदम यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असून त्यांना राजकारणातून संपवण्याचा डाव मांडला जात आहे. सामान्य शिवसैनिक म्हणून ही गोष्ट खटकल्याने याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी शहरात हे बॅनर लावण्यात आल्याचा दावा आमले यांनी केला आहे. कोणतंही पद नसले तरी शिवसैनिक हीच आमची ओळख असून शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यावर होत असलेल्या आरोपामुळे त्यांच्या समर्थनात हे बॅनर लावल्याचा दावा त्यांनी केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: