‘NCB, ED वापरून झाली असेल तर सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा’
हायलाइट्स:
- खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर
- नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार
- केंद्र सरकारवर केली घणाघाती टीका
संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांनी केलेल्या कामांची उद्घाटनं केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. ‘हे सरकार पुलोदच्या प्रयोगाची पुनरावृत्ती आहे. त्यावेळी अनेक पक्ष एकत्र आले होते, तसंच या सरकारमध्ये आहे. सैन्य बोलावलं तरी हे सरकार पडणार नाही,’ असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
वाचा: ‘देश कोणाच्या मर्जीवर चालत नाही, उद्धव ठाकरेंचा केंद्रावर थेट निशाणा
संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की शरद पवारांचे अशी टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांना राऊत यांनी सुनावले. ‘मी ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही प्रवक्ता आहे. शरद पवार हे कोणी परगृहावरून आलेले नाहीत. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना गुरू मानलंय. त्याचं बोट धरून राजकारणात आल्याचं जाहीरपणे सांगितलंय. मला प्रश्न विचारणाऱ्या सोमय्या यांनी याविषयी माहिती घ्यावी,’ असा टोला राऊत यांनी हाणला. ‘माझा कणा मजबूत आहे, कोणी कितीही हल्ले केले तरी शिवसेनेसाठी मी उभा आहे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
‘प्रसाद लाड यांच्या विरुद्ध आवाज उठवा’
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी काल केला होता. त्याबाबतची कागदपत्रे सोमय्यांना दिली आहेत. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात ते पुरावे आहेत. सोमय्यांनी आता त्याविरोधात आवाज उठवावा, असं आव्हान राऊत यांनी दिलं. ‘किरीट सोमय्यांची बकबक आणि पकपक एक दिवस त्यांना आणि देशालाही अडचणीत आणेल,’ असंही राऊत म्हणाले.
वाचा: परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा सापडला? ‘या’ शहरात असल्याचा संशय