सोलापुर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी करणार अपक्षाला पुरस्कृत ?

सोलापुर लोकसभा मतदारसंघातिल वंचित बहुजन आघाडी करणार अपक्षाला पुरस्कृत?

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०४/२०२४ – सोलापूर लोकसभा मतदार संघातील तिरंगी होऊ पाहणारी लढत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अचानक माघार घेतल्यामुळे दुरंगी लढतीमध्ये रूपांतरित झाली आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुमारे दोन ते अडीच लाख मतदान असून मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती.

२०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे राहुल गायकवाड या तरुण नेतृत्वाला पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी बहाल केली होती.वाजत गाजत प्रचंड मोठ्या मिरवणुकीने वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बारस्कर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गायकवाड यांची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वरिष्ठांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अचानक उमेदवारी अर्ज काढून घेऊन पुणे गाठले आहे. या सगळ्याचा सर्वात मोठा धक्का हा वंचित बहुजन आघाडीच्या पारंपारिक मतदारांना बसलेला आहे.

पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला,नेत्याला विचारात न घेता वंचितच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेण्याच्याठीमागे मोठे षडयंत्र प्रस्थापित पक्षांमार्फत रचण्यात आले असल्याची खात्री वंचित बहुजन आघाडीच्या पारंपारिक मतदारांना झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर कोणाला फायदा होऊ शकतो व याकरता कोण षडयंत्र रचुन उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावू शकतो याचा अंदाज संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आलेला आहे.

राहुल गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्यामागे मोठी आर्थिक देवाण- घेवाण झाली असल्याची चर्चाही सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या चवीने चर्चिली जात आहे. भारतीय जनता पक्षानंतर वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे ज्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच कार्यरत आहे.त्यामुळे वंचितच्या उमेदवाराने अचानक माघारी घेण्याचा निर्णय वंचितच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी विचारधारेच्या, बहुजनवादी विचारधारेच्या मतदारांना पचनी पडलेला नाही. त्यामुळे या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या उमेदवारी माघार घेण्याच्या सूत्रधाराला पराभूत करण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये वंचितचे प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून एखाद्या अपक्ष उमेदवारास पुरस्कृत करण्यासाठी फिल्डींग लावलेली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या घटनेमुळे झालेले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी व या उमेदवारी माघार घेण्याच्या षडयंत्राच्या पाठीमागे असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला धडा शिकवण्यासाठी व सोलापूर लोकसभा मतदारसंघावर विजयाचा झेंडा लावण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पेटून उठले आहेत.त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार जरी लढाईत नसला तरी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार लवकरच वंचित बहुजन आघाडी तर्फे घोषित होऊ शकतो, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रणांगणात नाही याचा आनंद घेणाऱ्या लोकांचा आनंद हा क्षणभंगुर ठरणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमार्फत कोणत्या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करता येईल याची चाचपणी आणि त्यासंबंधाने अपक्ष उमेदवाराशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीमधील कार्यकर्त्यांच्या हवाल्याने असे समजले आहे की पंढरपूर शहरातील एका अपक्ष उमेदवाराबरोबर या संबंधात चर्चा सुरू झालेली आहे.लवकरच या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पुरस्कृत केलं जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्पर्धेतून बाद झालेली वंचित बहुजन आघाडी ही लवकरच अपक्षाला पुरस्कृत करून पुन्हा या लोकशाहीच्या निवडणुकीच्या रणांगणात विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची लढत ही दुरंगी न होता तिरंगीच होणार असे चित्र लवकरच मतदारसंघातील मतदारांना दिसून येईल.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading