कार्तिकी यात्रा : श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त, पुणे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते होणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.11-कार्तिक शुध्द प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा संपन्न होत असते. या वर्षी सन 2024 मध्ये कार्तिकी एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी माता, या देवतांची राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा आयोजित करण्यात येते.
तथापि राज्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पुजा करावी, याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 ची अधिसूचना प्रसिध्द झालेली असून, सदरच्या घोषणेपासून म्हणजेच दिनांक 14 ऑक्टोबर पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या मार्गदर्शनानुसार यावर्षीची श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा शासनाचा प्रतिनिधी म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त, पुणे व मानाचे वारकरी यांचे हस्ते सपत्नीक करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
शासकीय महापूजेपूर्वी मंदिर समिती मार्फत होणारी श्रीं विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची पाद्यपुजा व नित्यपुजा अनुक्रमे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते संपन्न होत असून शासकीय महापूजेसाठी कर्तव्यावरील प्रशासकीय अधिकारी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.