स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा आरोग्यवारी उपक्रमात विशेष सहभाग
वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; आरोग्यवारी उपक्रमातून व्यापक व्यवस्था
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ जून २०२५ : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण प्रवासासाठी आरोग्यवारी या उपक्रमाचा भव्य शुभारंभ श्री निवडुंग्या विठोबा मंदिर, नाना पेठ येथे पार पडला.
या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे,माजी आमदार रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक विशाल धनवडे तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या ऑनलाइन उपस्थित होत्या.महिला आयोगा च्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,आजच्या काळानुसार महिलांच्या गरजा बदललेल्या असून त्यानुसार योजना आणि सेवा आखणं काळाची गरज आहे. निर्मल ग्राम संकल्पनेप्रमाणेच आरोग्यवारी सारख्या उपक्रमातून महिलांसाठी विश्रांती गृहे, स्वच्छतागृहे आणि पोलिसांशी समन्वय यांचे नियोजन अत्यंत सकारात्मक पाऊल आहे.
त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी वारीमध्ये मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था व सुधारणा यावर भर दिला.मी स्वतः काही वेळा या टॉयलेट्सचा वापर केलेला आहे. अजून त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे,असे त्यांनी नमूद केले.जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचे सातत्यपूर्ण सहकार्य महिलांना दिलासा देऊ शकते, असे त्या म्हणाल्या.
वारी दरम्यान महिलांना होणाऱ्या त्रासा विरोधात ठाम भूमिका घेत त्यांनी स्पष्ट केलं की,जो कोणी महिलांना टार्गेट करत असेल, त्याचे गुप्त व्हिडिओ करून पोलिसांकडे पाठवा. पोलीस तत्काळ कारवाई करतील आणि अशा विकृत प्रवृत्तीला आळा बसेल.
लाडकी बहीण योजनेवर होत असलेल्या टीकेवर उत्तर देताना त्या म्हणाल्या,सरकारचा निधी हा संपूर्ण समाजाचा आहे. महिलांसाठी राखीव निधी ही त्यांच्या हक्काची बाब आहे. आदिवासी,अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांसाठी वापरला गेलेला निधी अन्यायकारक ठरू शकत नाही.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संयोजिका रूपाली चाकणकर यांचं विशेष कौतुक केलं.तंत्रज्ञानाच्या युगात महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे.महिलांनी एकत्र येऊन समर्थपणे उभं राहिलं, तर कोणत्याही आव्हानाला तोंड देता येऊ शकतातं,असे त्या म्हणाल्या.
डॉ.नीलम गोऱ्हेंनी उपस्थित सर्व वारकरी भगिनींना शुभेच्छा दिल्या आणि आरोग्यवारी उपक्रम हा समाजपरिवर्तनाच्या दिशेने उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
