पंढरपूर तालुका आधारविना निराधार ?

पंढरपूर तालुका आधारविना निराधार ?

पंढरपूर /अमोल कुलकर्णी/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील बहुतांश आधार कार्ड केंद्र हे बंद असल्याने तसेच आधार नूतनीकरण केंद्रही मर्यादित असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.

बहुतांश शाळकरी मुलांना नव्याने स्कूल अपडेट प्रणालीमध्ये सरल पोर्टलला मुलाचे नाव,जन्मतारीख,पत्ता,नावातील छोटे-मोठे बदल,फोटो हे साम्य न दिसल्याने मुलांना सरल प्रणालीत समाविष्ट करून घेता येत नाही.त्यामुळे शासन शाळांना मुलांचे आधार कार्ड अपडेट करून आणावयास सांगत आहेत.त्यासाठी पालकांना मात्र पंढरपूर शहरात वणवण फिरावे लागत आहे.

अशातच काही आधार अपडेट केंद्र कर्मचारी हे अवाजवी रक्कम मागत असल्याने आर्थिक लूट होत आहे.पोस्ट मुख्य कार्यालय येथे दररोज ५० ते ६० कार्ड अपडेट केले जातात पण त्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना सुटी घेऊन दिवसभर वाट पहात बसावे लागत आहे.उप डाकघर असून तेथील ही सोय बंद केल्याचे दिसून येत आहे.पंचायत समिती मागे असणारे कार्यालय सर्व्हर मुळे वारंवार बंद पडत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्या व विद्यार्थी संख्या असणाऱ्या पंढरपूर तालुक्यासाठी किमान ५० केंद्र गरजेचे असताना काही बोटावर मोजता येणारी केंद्रे म्हणजे वेठीला धरण्याचा प्रकार दिसून येतोय.खेड्यातील पालक आपली मजुरी बुडवून शहरात फेऱ्या मारून हालअपेष्टा सहन करत आहेत. आधार कार्ड ही डोकेदुखी ठरू लागली आहे.

शिवाय अपडेट केलेले कार्डही ठराविक पत्यावर पाठवले जात नाहीत.ठराविक केंद्रांना मक्तेदारी देऊन मलिद्याची सोय काही ठराविक अधिकारी यांनी केली असल्याने यामध्ये इतर कोणतेच प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. तसेच ४ आमदार २ खासदार असणाऱ्या तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आधार निराधार ठरू लागले आहे. या आधार योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्राची संख्या वाढवून त्यात सुलभता नाही आणली गेली तर एक दिवस तहसीलदार यांच्या कार्यालयापुढे ग्रामस्थ जमाव घेरा घालण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे अध्यात्मिक राजधानी असणारे पंढरपूर शहर हे एका बाजूला नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे तर दुसऱ्या बाजूला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्व्हर देखील उपलब्ध होत नाही याची खंत ऑपरेटर बोलून दाखवत आहेत.

कॉरिडॉरबाबतीत जिल्हाधिकारी व तीन उपजिल्हाधिकारी पंढरपूरसाठी नियुक्त केलेले असताना निदान आधार सेवा केंद्र संख्या तरी वाढवावी अशी मागणी पालकांतून होत आहे.

Leave a Reply

Back To Top