प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५: महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा विज्ञान क्षेत्रात गौरव

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५: महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा विज्ञान क्षेत्रात गौरव

वीर बालदिनी २० बालकांचा सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते अर्णव महर्षीस पुरस्कार

वीर बालदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ ने देशातील २० बालकांचा सन्मान करण्यात आला असून महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा विज्ञान क्षेत्रात गौरव झाला आहे.

नवी दिल्ली | दि. २६-PradhanMantri Rashtriya BalPuraskar वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २० बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२५ प्रदान करण्यात आला. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात हा गौरव करण्यात आला.

या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी याचाही समावेश असून त्याला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे. लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांसाठी AI-आधारित पुनर्वसन उपकरण आणि ॲक्टिव्ह हँड रिस्ट बँड विकसित केल्याबद्दल अर्णव महर्षीचा गौरव करण्यात आला.विशेष म्हणजे हे नवोन्मेषी उपकरण त्याने स्मार्टफोन व लॅपटॉपच्या सहाय्याने तयार केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य,विज्ञान- तंत्रज्ञान,कला-संस्कृती,समाजसेवा,क्रीडा आणि पर्यावरण या सात क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशभरातील बालकांना पुरस्कार प्रदान केले. यामध्ये ९ मुले व ११ मुलींचा समावेश असून दोन पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले.

यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी,राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.

पुरस्कृत बालके भारताच्या अमृत पिढीचे प्रतिनिधी – राष्ट्रपती

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की,ही बालके भारताच्या अमृत पिढीचे खरे प्रतिनिधी आहेत.शारीरिक,मानसिक व सामाजिक अडथळ्यांवर मात करून त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या बालकांचे संकल्प आणि प्रयत्न २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Back To Top