नगरपालिका जिंकूनही पंढरपूर भाजप अडचणीत;जुनी भाजप विरुद्ध नवी भाजप संघर्षाने पक्षात धुसफूस BJP internal conflict
निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप;सत्तेचा माज की संघटनात्मक अपयश ?
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –BJP internal conflict Pandharpur नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवूनही पंढरपूर भाजप सध्या गंभीर अंतर्गत संघर्षात अडकली आहे.निकालानंतर उत्सव साजरा होण्याऐवजी जुनी भाजप विरुद्ध नवी भाजप असा संघर्ष चव्हाट्यावर आला असून पक्षातील नाराजी आता उघडपणे दिसू लागली आहे. हा केवळ मतभेदांचा प्रश्न नसून भाजपच्या संघटनात्मक अस्तित्वालाच आव्हान देणारी स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणारे,निवडणुकीत रात्रंदिवस काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आज दुर्लक्षित झाल्याची तीव्र भावना व्यक्त करत आहेत. उमेदवारीपासून ते सत्तेतील पदवाटपापर्यंत नव्या आणि बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप जुने कार्यकर्ते उघडपणे करत आहेत. मतं आम्ही मागायची, झेंडे आम्ही उचलायचे आणि सत्तेची फळं दुसऱ्यांनी चाखायची? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
निवडणूकपूर्व काळात पक्ष संघटना मजबूत असल्याचा दावा केला जात होता; मात्र निकालानंतर तो फोल ठरल्याचे चित्र आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काही मोजक्या नेत्यांनी निर्णय लादल्याने हाय-कमांड संस्कृतीवर जोरदार टीका होत आहे. यामुळे पक्षात गटबाजी अधिक तीव्र झाली असून, अनेक कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे, भाजपने डबल इंजिन सरकार आणि विकासाचा अजेंडा यावर निवडणूक लढवली; मात्र सत्तेत आल्यानंतर विकासाऐवजी अंतर्गत संघर्ष, अहंकार आणि पदासाठीची चढाओढच समोर येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला असून, भाजपची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, हा संघर्ष वेळीच थांबवला नाही तर पंढरपूरमध्ये भाजपसाठी भविष्यातील निवडणुका अधिक कठीण ठरू शकतात. नाराज कार्यकर्ते शांत बसणार नसून, हा असंतोष कधी उफाळून येईल, याचा अंदाज बांधता येत नाही.नगरपालिका विजय हा भाजपसाठी आनंदाचा क्षण ठरण्याऐवजी, अंतर्गत फूट उघड करणारा टर्निंग पॉइंट ठरतोय, अशी तीव्र चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.





