रील हिरो आणि रियल हिरो यातील फरक विद्यार्थ्यांना कळणे गरजेचे – अभिनेते मकरंद अनासपुरे

रील हिरो आणि रियल हिरो यातील फरक विद्यार्थ्यांना कळणे गरजेचे – अभिनेते मकरंद अनासपुरे | MIT Vishwashanti Gurukul Pandharpur

एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल पंढरपूरचा VGS Tarang 2025 क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४ डिसेंबर : आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांवर सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असताना रील हिरो आणि रियल हिरो यातील भेद ओळखता येणं अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. वाखरी, पंढरपूर येथे असलेल्या MIT Vishwashanti Gurukul School and Junior College यांच्या वतीने आयोजित ‘VGS Tarang 2025’ या तीन दिवसीय आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

समाजात घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करत मकरंद अनासपुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच समाजासाठी योगदान देणाऱ्या खऱ्या नायकांची ओळख होणे गरजेचे आहे. मातृभाषेचा अभिमान बाळगणे ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. देशप्रेम केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता कृतीतून दिसायला हवे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी भारतीय महिला दृष्टिहीन टी-२० क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम, माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे, राघवेंद्र चाटे (संचालक – स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स), शैक्षणिक प्रमुख शीतल वर्मा,प्रा.के.सी.मिश्रा, कर्नल डी.के. उपाध्याय, शिवाजी गवळी,डॉ. स्वप्निल सेठ यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन दिवस चाललेल्या VGS Tarang 2025 Festival मध्ये पंढरपूर, सोलापूर, बार्शी, लोणी काळभोर,कोथरूड, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि नवी मुंबई (उळवे) येथील आठ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

गायन, नृत्य, अभिनय, वादविवाद यांसह धावणे, जलतरण, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, गोळा फेक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले.

दृष्टिहीन महिलांच्या टी-२० क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, चिकाटी आणि मेहनतीचे महत्त्व सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. स्वाती कराड चाटे यांनी मूल्याधारित शिक्षण, भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधण्यावर एमआयटी विश्वशांती गुरुकुलचा भर असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले. आभार रंजिता चौकेकर यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Back To Top