धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपचा इंडिया आघाडीला पाठिंबा
सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना दिल्लीत पाठवण्याचा केला निर्धार
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून या मतदारसंघात दिवसेंदिवस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे.आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीने देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. देशातील धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देवून मतदान करण्याची भूमिका शनिवारी स्पष्ट केली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रणिती शिंदे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर संविधान बचावाच्या या लढ्यात आपण उमेदवार देणार नसल्याचे एमआयएम कडून स्पष्ट करण्यात आले तर दुसरीकडे वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी देखील संविधानाच्या लढ्यासाठी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत असल्याचे स्पष्ट करत निवडणूक रिंगणातून माघार घेतली. आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष हे देखील इंडिया आघाडी सोबत आहेत त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे बळ अधिक वाढले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील शनिवारी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी सोबत चर्चा करून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी भाकप कार्यकारणी सदस्य तानाजी ठोंबरे, जिल्हा सेक्रेटरी डॉ.प्रवीण. मस्तुद,शहर सेक्रेटरी अंबादास तडकापल्ली, कॉ.मधुकर मडुर,काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे,आयटक चे अनिरुद्ध नकाते,जिल्हा कौन्सिल सदस्य नरसय्या कंदुल,तिरुपती परकीपंडला,शेखर बीनगुंडी,श्रीनिवास वड्डेपल्ली,सोमनाथ आडम,विक्रम तडकापल्ली आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या पाठिंब्यासंदर्भात बोलताना भाकपचे सोलापूर शहर कौन्सिलचे सेक्रेटरी कॉम्रेड अंबादास तडकापल्ली म्हणाले की, भारतीयांच्या आर्थिक व सामाजिक शोषणा विरुध्द सातत्याने संघर्ष करणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा धर्मनिरपेक्ष विभागणीपेक्षा धर्मनिरपेक्ष मतांच्या एकीकरणावर जोर देत आहे. संविधाच्या रक्षासाठी व धर्मरिपेक्ष शक्तींच्या राजकीय वाढीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.देशात भाजपा धर्माध वातावरण करून देशातील सहिष्णूता संपवू पाहत आहे, देशात फॅशिस्ट विचारांचा अंमल वाढला आहे त्यामुळे भाजपाचा पराभव करणे आवश्यक झाले आहे. या धर्मांध शक्ती विरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठीच देशात आणि राज्यात आमचा पक्ष इंडिया आघाडीसोबत राहणार आहे.
२०२४ ची लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, हे लक्षात घेवून सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचेही तडकापल्ली यांनी स्पष्ट केले. तसेच येणाऱ्या ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या निवडणूकीत आपले मत कॉंग्रेसचे इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना करण्याचे आवाहन देखील त्यांनी सर्व भाकप कार्यकर्ते आणि मतदारांना केले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.