महाविकास आघाडीने कोल्हापूर आणि सांगली येथील जनतेची दिशाभूल केली… डॉ.निलमताई गोऱ्हे

मतदानासाठी भरपगारी सुट्टीची अंमलबजावणी करण्यास निवडणुक आयोगाचे प्रयत्न कौतुकास्पद … डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीने कोल्हापूर आणि सांगली येथील जनतेची दिशाभूल केली… डॉ.गोऱ्हे

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील अनेक भागात प्रचारासाठी जाण्याचा योग आला आहे. त्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराना चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. महायुतीने ४५ जागां जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

पूर्वी राजकीय प्रचारामध्ये महिला येत नव्हत्या.आता ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही अशाही स्त्रिया आता राजकीय प्रचारात मोठ्या प्रमाणात आहेत.मतदारांनी मतदानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मतदानासाठी भरपगारी सुट्टीची अंमलबजावणी करण्यास निवडणुक आयोगाचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

महायुतीने ६ लाख ८६ हजार तरूणांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली. यासाठी १ हजार १७५ नामांकित उद्योजक व त्यांच्या औद्योगिक संघटना आणि प्लेसमेंट संस्था यांचेसोबत सामंजस करार केले.

नागपूर, लातूर, बारामती, अहमदनगर आणि ठाणे येथे नमो महारोजगार मेळाव्यांतून दोन लाख रोजगाराच्या संधी प्रत्येक महसूल विभागात मेळावे घेवून उपलब्ध करून दिल्या. आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांमधील नक्षलग्रस्त क्षेत्रात ‘कौशल्य विकास कार्यक्रम’, गडचिरोली येथे दोन नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या आहेत असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

मुंबईतील वरळी येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन उभारणार, पोलिस शिपायांच्या १८ हजार ३३१ रिक्तपदांवर भरती, आणखी विविध विभागाच्या १७ हजार ४० पदे भरणे सुरु आहेत. सरकारने १ लाख ५३ हजारांपेक्षा अधिक रिक्तपदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेते, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पारितोषिक रक्कमेमध्ये वाढ महायुतीच्या सरकारने केले असल्याचे देखील डॉ.गोऱ्हे यांनी संगितले.राज्यात ३५० तालुक्यात २ हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे सुरू आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून २५ हजार उद्योग घटक तर ३० टक्के महिला उद्योजक त्याचबरोबर सुमारे ५० हजार नवीन रोजगार दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. अंमलबजावणी केलेली लोकहिताची कामे व कार्यक्रम पुढेही वेगाने पुढे जावेत यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन शिवसेना नेत्या डॉ.नीलम गो-हे यांनी केले.

कोल्हापूर च्या जागेबाबत सांगायच झाल्यास शाहू महाराजांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली असती तर शाहू महाराजांची निवडणुक बिनविरोध झाली असती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा ला त्याचे केवळ श्रेय पाहिजे होते.ही बाब उमेदवारी मधून दिसत आहे.त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीच्या निवडणुकीत मविआ ने जनतेची दिशाभूल केली आहे अशी भूमिका गोऱ्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

यावेळी डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यात आतापर्यंत दोन निवडणुकीचे टप्पे झाले आहेत तर तिसर्‍या टप्प्याचे ७ मे रोजी मतदान होत आहे. मात्र मागील दोन टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. उद्या सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी घरा बाहेर पडावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *