शिरूरच्या विकासाकरिता शिवाजीराव आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा-शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे

शिरूरच्या विकासाकरिता शिवाजीराव आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा-शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे महिला मेळाव्यातून नागरिकांना आवाहन

लोकसभेची निवडणूक म्हणजे विकास विरुद्ध द्वेष

पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ मे २०२४ : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांचा महिला मेळावा आज मंचर ता. आंबेगाव, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर, सौ. कल्पना आढळराव पाटील, सौ.किरण दिलीप वळसे पाटील यांसह महायुती घटक पक्षातील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

या मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या की, लोकसभेची निवडणूक ही विकास विरुद्ध द्वेष अशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्रियांचे सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने योजना राबवलेल्या आहेत. महिला धोरणातून महिलांना प्रशासकीय व अर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिलांना ५० टक्के बसमधे सवलत, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना, येत असलेली मोफत शिक्षणाची योजना यातून शासन महिलांसाठी चांगले कार्य करीत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनातून महिलांना सक्षम केले जात आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमुळे महिला सुरक्षित आहेत. तसेच स्त्रियांना राजकारणात सहभागी होता यावे याकरिता त्यांच्यासाठी लोकसभा,विधानसभेत आरक्षण देणार विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मंजूर केले आहे. महिलांना राजकारणात आरक्षण मिळाल्याने निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे त्यामुळे स्त्रियांमध्ये महत्वकांक्षा निर्माण झाली आहे. विरोधकांकडून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान झाल्यावर राज्यघटना बदलणार असल्याचा अपप्रचार सुरू आहे.त्यांच्याकडे प्रचारासाठी विकासाचे मुद्दे नाहीत त्यामुळे ते समाजात, जातींमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत.

केंद्रात व राज्यात एकाच विचारांची सरकारे असल्यास विकासाला अधिक गती मिळते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यात पुन्हा आणण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. शिरूर लोकसभेत आढळराव पाटील यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. मोठ्या प्रमाणात विकासनिधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे.मंचर खेड बाह्यवळण रस्ता,नारायण गाव व खेड घाट बाह्यवळण रस्ता, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा, नगरपरिषद व नगरपालिका हद्दीतील विकासकामे, पाणीपुरवठा योजना, जिल्हा नियोजन निधी, केंद्रीय रस्ते निधी, पीएमआरडीए निधी, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय निधी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना निधी, सामाजिक न्याय निधी यांसारखे अनेक निधी शिरूर लोकसभा क्षेत्रात आढळराव पाटील यांनी मंजूर करून घेतलेले आहेत.

आढळराव यांचा जनसंपर्क दांडगा असून ते दर रविवारी लांडेवाडीमध्ये लोकांना आवर्जून भेटत असतात. त्यामुळे जनतेला सहज उपलब्ध होणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करून दिल्लीला पाठवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करावेत असे आवाहन शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर, सौ.कल्पना आढळराव पाटील, सौ.किरण दिलीप वळसे पाटील यांनी देखील संबोधित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *