श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील सेवा पुरवठा कामाचा मे.शुभम सर्व्हिसेसचा ठेका रद्द -कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मे.शुभम सर्व्हिसेसची सेवा समाधानकारक नसल्याने त्यांचा ठेका रद्द – मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

पंढरपूर दि.11 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवास, वेदांता भक्तनिवास, व्हिडीओकॉन भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने विहित प्रक्रिया राबवून मे. शुभम सर्व्हिसेस, पुणे यांना माहे जुलै 2024 मध्ये ठेका देण्यात आला होता. तथापि, त्यांची सेवा समाधानकारक नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
समितीच्या तिन्ही भक्तनिवासाचे गृह सज्जा,स्वागत कक्ष,पार्कींग,लॉन्ड्री,गार्डन देखभाल,दुरूस्ती स्वच्छता साहित्यासह व्यवस्थापन (सर्व प्रकारचे किरकोळ स्वरूपाच्या देखभाल दुरूस्ती व पेस्ट कंट्रोल) कामकाजासाठी बाह्यस्त्रोत यंत्रणा नियुक्ती करणेकामी विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबविण्यात आली होती.त्यामध्ये मे.शुभम सर्व्हिसेस,पुणे यांची ई निविदा मंजुर करण्यात आली होती.तसेच दि.25/07/2024 रोजी करारनामा देखील केला होता.तथापि,करारनाम्या वर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करणे,कारणे दाखवा नोटीसीस उत्तर न देणे किंवा दिल्यास मोघम व असमाधानकारक खुलासा देणे,दिलेल्या सुचनांचा विचार न करणे,सेवेत सुधारणा न करणे,भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून न देणे,भाविकांना खोल्या उपलब्ध करून न देणे,स्वच्छता कामी करारनाम्यानुसार यंत्रणा उपलब्ध न ठेवणे, स्वच्छतेसाठी रासायनिक व उपयोग्य वस्तूचा वापर न करणे,भाविकांना रूममधील सोई सुविधा न देणे,चांगली स्वच्छता न ठेवणे,देखभाल दुरूस्ती न करणे व त्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त न करणे, खोल्याचे परवानगी शिवाय आगाऊ बुकींग करणे,खोल्यातील साहित्य चोरीला जाणे,वेळोवेळी अहवाल न देणे, कार्यादेशाप्रमाणे कामकाज नाही, भाविकांना खोल्यामध्ये साबण - हॅण्डवॉश न देणे, खोल्या व्यवस्थित व वेळेत चेकआऊट न करणे तसेच विद्युत, माळीकाम, सुतारकाम सेवा न देणे, वृक्षांची देखभाल न करणे, पेस्टकंट्रोल न करणे, खोल्यांतील लॉन्ड्री साहित्य वेळेत धुलाई न करणे, शैक्षणिक पात्रतेचे कर्मचारी न नेमणे,नोंदवह्या न ठेवणे,माहितीसाठी व मार्गदर्शनपर उपबंधाचे पालन नाही व इतर अनुषंगीक बाबीं विषयी पूर्तता न करून करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केला आहे.
याबाबत त्यांना लेखी व मौखिक सुचना अनेकवेळा करूनही कोणत्याही प्रकारची सुधारणा केली नाही. चांगल्या पध्दतीने सेवा पुरवठा न केल्याने भक्तनिवास व मंदिर समितीची प्रतिमा मलिन होऊन भक्तनिवास येथे निवासासाठी येणा-या भाविकांची संख्या कमी झाली. पर्यायाने उत्पनात घट होऊन, मंदिर समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे व होत आहे, याबाबत त्यांना दि.21 जानेवारी, 2025 रोजी कायदेशीर नोटीस देऊनही त्यावर अद्यापपर्यंत उत्तर दिले नाही.

त्यावर मंदिर समितीच्या दिनांक 3 मार्च रोजीच्या सभेत चर्चा करण्यात आली. चांगली सेवा मिळत नसल्याने मंदिर समितीने संस्थे विरूध्द अनेकवेळा कारणे दाखवा नोटीस बजावून व समज देऊन ही सुधारणा होत नसल्याने तसेच वर नमूद अन्य कारणाने करारानुसार दंडात्मक कारवाई वेळोवेळी केली होती. तथापि, त्यासंदर्भात सुधारणा अथवा कोणतीच कारवाई झाली नाही. सेवा पुरवठा कालावधीच्या एक वर्षातील 8 महिने होऊन देखील सुधारणा नाही व यापूढे देखील सुधारणा होईल असे वरील कारणास्तव वाटत नाही. तसेच सदरचा करार यापूढे देखील सुरू ठेवल्यास, मंदिर समितीची प्रतिमा जनसामान्यात मलिन होईल. त्याचा भाविकांच्या सोई सुविधेवर परिणाम होऊन, त्याचा रोष मंदिर समितीवर येऊ शकतो. त्यामुळे मे. शुभम सर्व्हिसेस, पुणे ही संस्था करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कामकाज करू शकत नसल्याने आणि वारंवार नोटीस देऊनही त्या संदर्भात खुलासा व सुधारणा होत नसल्याने, त्यांच्याशी करण्यात आलेला करार रद्द करणे क्रमप्राप्त झाले होते असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.