मारापुर येथील अवैध दारू विक्री बंद करा..सरपंच विनायक यादव यांचे पोलिसांना पत्र
मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठी वसलेल्या मारापुर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून ही दारू विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी मारापुर गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली असून त्या निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक मंगळवेढा,पोलीस उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे दिल्या आहेत.
सरपंच विनायक यादव यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की मारापुर हे साडेतीन हजार लोक वस्ती असलेले गाव असून गावात विविध जाती- धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, गावातील नागरिकांचे नेहमीच प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य असते.मारापुर गावांमध्ये एकही परवानाधारक दारू विक्री दुकान नाही मात्र गावातील काही अल्पसंतुष्ट व्यक्ती अवैधरित्या बाहेरून दारू आणून गावात विकत असल्याने गावामध्ये व्यसनाधींनेतेचे प्रमाण वाढत आहे. गावात दारू पिऊन नाहक शिवीगाळ करणे, अरेरावीची भाषा वापरणे, महिलांना लज्जास्पद वाटेल अशी भाषा वापरणे व तसे वर्तन करणे, दारू पिऊन सार्वजनिक तसेच शासकीय मालमत्तांच्या ठिकाणी दांडगाईने प्रवेश करणे, त्या मालमत्तांचे नुकसान करणे असे सर्रास प्रकार गावात घडत आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून गोरगरिबांचे संसार उघड्यावर येत आहेत त्यामुळे महिला वर्ग त्रस्त झालेला असून ते वारंवार दारू विक्री बंदीची मागणी करीत आहेत तरी आमच्या गावातील दारू विक्री व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच विनायक यादव यांनी ग्रामपंचायत ठरावाद्वारे पोलीस प्रशासनास केली आहे.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये नुकतेच आमदार समाधान आवताडे यांनीही मतदारसंघांमध्ये दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते.आता मारापूर ग्रामपंचायतीने ही अवैध दारूबंदीची मागणी केली असून प्रशासन यावर काय कारवाई करते याची प्रतिक्षा लागली आहे.