राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू
पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली. ते पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची आज भेट घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेची परिस्थिती दाहकता समोर मांडून यावर ठोस उपाय योजना करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू, हा महामार्ग तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यंदा राज्यात अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असतानादेखील राज्य सरकार कोणत्याही ठोस उपाययोजना करतान दिसत नसून दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी पुर्णपणे उध्दवस्त झाला आहे. आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवून प्रशासनाने उपाययोजना करण्यास टाळाटाळ करत आहे. जनावरे पाण्याविना तडफडत आहे.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सह इतर बहुतांश जिल्ह्यात चारा पाण्याची कमतरता होत असतांनादेखील यंदा राज्य सरकारद्वारे एकही चारा छावणी उभी केली नाही.एका बाजूला दुष्काळाने घेरले असताना काही भागात अवकाळीमुळे उरली सुरली हाताशी आलेली पिके, फळे, बागा उद्ध्वस्त झालेल्या असल्याने याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यात खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज वाटप नियोजन प्रश्नी प्रशासन उदासिन दिसत आहे. पाण्याचे योग्य नियोजन न राखल्याने ग्रामीण भागात गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला असून ग्रामीण जनजीवन अक्षरशः पूर्ण उध्वस्त होण्याच्या अवस्थेत असताना सरकारकडून अत्यंत तुटपुंजी उपाययोजना केली जात आहे. दुष्काळमुळे राज्यातील शेतकरी पार मेटाकुटीला आलेला असून त्याच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कर्ज वसुलीसाठी बँका वित्त पुरवठादार संस्था तगादा लावत आहे.
राज्यात त्वरीत दुष्काळ जाहीर करत सर्व प्रथम शेतकऱ्याकडून करण्यात येणाऱ्या पीक कर्ज वसुलीस ताबडतोब स्थगिती देत ज्या ज्या महसूल क्षेत्रात दुष्काळ तीव्रता सर्वाधिक आहे त्या ठिकाणी पीक कर्ज माफी घोषित करावी लागणार आहे. अवकाळीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यावी .राज्यात अद्यापही शासनाद्वारे चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत, मागणी येईल त्या गावात विनाविलंब चारा छावणी सुरु करण्यात यावी. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरुप धारण करत असल्याने ज्या ज्या गावांत मागणी येईल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर त्वरीत उपलब्ध करुन मिळण्यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे,अशीही मागणी त्यांनी केली.

