मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०५/२०२४ – मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने घरांचे आणि शेतीतील पिकांचे फळबागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या झालेल्या नुकसानीची आज विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली.

मंगळवेढा तालुक्यातील वादळीवाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्याने नागरिक उघड्यावर आले आहेत .आज प्रत्यक्ष भेट देऊन येथील नुकसानाची पाहणी केली.यावेळी नुकसानग्रस्त बांधवांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेत नुकसानीचा आढावा घेतला.

या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त बांधवाना धीर देत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नागरिकांना शासना मार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.