अवैध वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्‍यांना चंद्रभागेपासुन दूर ठेवले काय ? – गणेश अंकुशराव

अवैध वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्‍यांना चंद्रभागेपासुन दूर ठेवले काय ? – गणेश अंकुशराव

पंढरपूर, ज्ञानप्रवाह न्यूज: – चंद्रभागेच्या पात्रात होणारा अवैध वाळु उपसा जिल्हाधिकारी यांना कळू नये, वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्यांना आषाढीच्या पार्श्‍वभुमी वरील पाहणीसाठी चंद्रभागेच्या पात्रात महसुल अधिकार्‍यांनी नेले नाही काय ? असा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी तळांवर,मार्गावर वारकरी व भाविकांना कोणतही अडचण निर्माण होऊ नये तसेच भाविकांना पालखीतळावर प्रशासनाच्या वतीने अधिकच्या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली.परंतु चंद्रभागेच्या पात्राकडे त्यांना नेण्याचे महसुल अधिकार्‍यांनी टाळले, असे गणेश अंकुशराव म्हणाले.

चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळु उपशामुळं पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्‍न कायम असुन याविरुध्द आम्ही वारंवार वेगवेगळी आंदोलनं केली परंतु पंढरपुरमधील माजी व आजी महसुल अधिकारी मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत, आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाही चंद्रभागेच्या पात्रात पडलेले खड्डे बुजवले गेले नाहीत, चंद्रभागेमध्ये गटाराचे पाणी सोडले जाते या सर्व बाबी कार्यक्षम जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या निदर्शनास आणुन देणेसाठी पंढरपुरातील महसुल अधिकारी यांनी त्यांना चंद्रभागा वाळवंट व नदीपात्राची पाहणी करण्यासाठी नेणे आवश्यक होते, परंतु जाणुन-बुजून या महसुल अधिकार्‍यांनी आपले पाप उघडकीस येण्याच्या भीतीने जिल्हाधिकारी यांना चंद्रभागेच्या पाहणी दौर्‍यासाठी नेले नाही असा आरोप गणेश अंकुशराव यांनी केला असुन आता पुन्हा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना चंद्रभागा नदीपात्राची पाहणी करण्याची विनंती करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *