सोलापूरचा पाणी व विमानसेवेचा सेवेचा प्रश्न लोकसभेत मांडण्याचे सूतोवाच
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०६/२०२४: सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच योग्य पालकमंत्री न लाभल्याने सोलापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप करीत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले. याचवेळी त्यांनी सोलापूरचा पाणी व विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचेही सांगितले.

शहरातील नालेसफाई, पाणी प्रश्न,खराब रस्ते, समांतर जलवाहिनी आधी संदर्भात आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या बुधवारी महापालिकेत आल्या होत्या त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.सक्षम नेतृत्वाभावी सोलापूरचे झालेले नुकसान भरून काढण्याची वेळ आता आली आहे. 99 कोटींच्या नालेबांधणीचा तसेच अमृत दोन अंतर्गत 433 कोटींच्या प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.या संदर्भात या विभागाचे सचिव गोविंदराज यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली आहे. या संदर्भात पुढील पाठपुरावा करणार आहे.
दरम्यान या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. शहरात दररोज 180 एमएलडी पाण्याचा उपसा होत असताना दोन दिवसात पाणीपुरवठा करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला. यावर प्रशासनाने त्यांना साठवण क्षमतेचा अभाव असल्याचे सांगितले. अमृत दोन या योजनेमध्ये स्टोरेज आणि उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसात पाणीपुरवठा देणे शक्य होईल असे उत्तर यावेळी प्रशासनाने दिले.सोलापूर शहरामध्ये नालेसफाई, ड्रेनेजचे लाईन स्वच्छतेचे हे काम चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळेच पहिल्याच पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी गेले,असा आरोप टीका खासदार शिंदे यांनी केला. यावर भुयारी गटार आणि पावसाळी गटार या दोन्ही कामांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत ते झाल्यास नाल्यांची, गटारींची दुरुस्ती होईल आणि पावसाळी पाण्याच्या लाईनचीही दुरुस्ती होईल,असे उत्तर प्रशासनाने दिले. खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा नाले सफाई करण्याची सूचना प्रशासनाला केली.
यावेळी उपस्थित माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, बाबा करगुळे, मनोज यलगुलवार, नागेश ताकमोगे यांनी शहरातील अनेक समस्यांचा पाढा वाचला.
नागेश ताकमोगे यांनी आसरा येथील उड्डाणपूल काम अद्याप सुरू नाही, केवळ फलक लावलेले आहे, असे निदर्शनास आणले असता त्यावर पाठपुरावा करू असे उत्तर प्रशासनाने दिले.

अमृत दोन योजना किती वर्षात तरी होईल असा प्रश्न असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला असता प्रशासनानेही योजना तीन वर्षात मार्गी लागेल,असे उत्तर दिले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी समांतर योजनेच्या आढावा घेतला.ही योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.तसे झाल्यास शहराचा पाणी प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
या बैठकीस महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले,अतिरिक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे,मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर महापालिका पत्रकार संघातर्फे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार वेणुगोपाळ गाडी, युसुफ शेख,विक्रांत कालेकर,राहुल रणदिवे, संदीप वाडेकर,यासीन शेख आदी उपस्थित होते.
गत अडीच वर्षापासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नाही.त्यामुळे अधिकारी वर्ग सुस्त झाला आहे त्यांना आता जागे करण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधींनी वारंवार बैठका घेतल्यास प्रशासनावर दबाव राहतो, असेही खासदार शिंदे यांनी याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी सुशील बंदपट्टे,तिरुपती परकीपंडला, सैफन शेख, श्याम कदम, श्रीनिवास रामगल, सचिन चौधरी आदी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.