आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरु
भाविकांना मिळणार सुलभ व जलद दर्शन -सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०७/०७/२०२४ – दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.यावर्षी दि ०७ जुलै रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे.विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे.त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख,धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील.दि 26 जुलै प्रक्षाळपुजा पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे.
श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी, बलभीम पावले व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय, दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर वाटप करण्यात येत आहे. दर्शन रांगेतील भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालवून भाविकांना जलद व सुलभ दर्शन देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.