आटपाडीच्या स्वतंत्रपुरातच महिला कैदी व बाल गुन्हेंगारां वर संस्कार करणारी नवी वसाहत निर्माण करा
आटपाडीच्या स्वतंत्रपुरातच महिला कैदी व बाल गुन्हेंगारांवर संस्कार करणारी नवी वसाहत निर्माण करा – शरद पवार, उध्दव ठाकरेंकडे सादिक खाटीक यांची मागणी Create a new colony in Atpadi’s Swatantrapur to cultivate women prisoners and juvenile delinquents – Sharad Khatik’s demand to Sharad Pawar, Uddhav Thackeray
आटपाडी,दि.२१ /प्रतिनिधी -“दो आँखे बारह हाथ” या चित्रपटाच्या माध्यमातून जगविख्यात झालेल्या आटपाडीच्या स्वतंत्रपूर वसाहतीतच स्वतंत्रपूर सारखीच महिला कैद्यांसाठीची नवी वसाहत सुरु करा तसेच बोस्टन स्कुल सारखे बाल गुन्हेगारांवर संस्कार करणारे बाल गुन्हेगार सुधारगृह स्वतंत्रपुरातच करून स्वतंत्रपुरचे अभिनव परिवर्तन करा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आटपाडीचे सादिक खाटीक यांनी केली आहे .
आटपाडीच्या स्वतंत्रपुर येथील खुल्या पुरुष कैद्यांच्या धर्तीवर स्वतंत्रपूर सारखे खुल्या महिला कैद्यांची नवीन वसाहत राज्यात उभारणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील यांनी केल्याच्या पार्श्वभूमिवर सादिक खाटीक यांनी महविकास आघाडीच्या नेत्यांसह विविध मंत्रीमहोदयांचे याबाबत लक्ष वेधले आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी जवळील स्वतंत्रपूर कैद्यांच्या खुल्या वसाहतीचा, परिसराचा विकास,विस्तार आणि कालानुरूप परिवर्तन करा अशा मागणीचे १० जुलै २०२० रोजी राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख,जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील ,गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई, गृहराज्यमंत्री (शहरे ) सतेज डी.पाटील,सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दतात्रय भरणे,प्रधान सचिव विधी व न्याय विभाग , गृह सचिव गृह विभाग,तुरुंग महासंचालक, पोलीस महासंचालक आदींना ईमेल व पोस्टाने मागणी केली आहे .
आटपाडी शहरालगतचे स्वतंत्रपूर या कैद्यांच्या मुक्त वसाहतीत जन्मठेपेतील कैद्यांना अंतिम काही वर्षे त्याच्या परिवारासह ठेवून शेतीच करून घेतली जाते . १९३७ - ३८ साली महात्मा गांधीजीच्या संकल्पनेतून तत्कालीन औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी , इंग्लडचे माजी राजदूत बॅरीस्टर आप्पासाहेब पंत प्रतिनिधी आणि फ्रेंच अभियंता भारतानंद उर्फ मॉरीस फ्रीडमन यांनी या स्वतंत्रपूर वसाहतीची रचना केली ,दो आँखे बारह हाथ या चित्रपटाच्या कथानकाचे मुळ उगम ठरलेले वसाहतीचे पहिले जेलर अब्दुल अजीज अब्दूल खालील काझी मास्तरांच्या प्रेम, खडतर श्रमाच्या तपश्चर्येतून या वसाहतीला त्याकाळी नवे आयाम मिळाले होते आणि महाराष्ट्र शासन या एका अजोड कल्पनेला टिकवून जन्मठेपेतील कैद्यांना अंतिम वर्षामध्ये शेती करून स्वतःच्या पायावर उभे रहायची संधी देते . ही संकल्पना म्हणजे काय हे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व्ही.शांतारामबापू आणि चित्रपट कथाकार ग.दि.माडगूळकर यांच्या दो आँखे बारह हाथ मधून समजू शकेल . गेली ८० वर्षे सुरु असलेल्या या उपक्रमाला अधिक विस्तारण्याची वेळ आलेली आहे त्याचा विचार व्हावा,असे सादिक खाटीक यांनी म्हटले आहे.
नाशिकमधील बाल गुन्हेगारांच्या बोस्टन सुधारगृह शाळेप्रमाणे स्वतंत्रपूरमध्येही बाल सुधार गृहाची वेगळी व्यवस्था करावी . दोन ते पाच वर्षे शिक्षा झालेल्या तरुण आणि तरुणी कैद्यांना नर्सिंग सारख्या कोर्सची व्यवस्था करून त्यांना कमवा आणि शिका ही योजना लागू करावी . शासनाच्या अत्यावश्यक आणि साथ नियंत्रण विभागामध्ये या सिस्टर आणि ब्रदर्सना शिक्षेनंतर नोकरीची तरतूद करावी . किमान ५०० जणांना एका वेळेस शिक्षित करता येईल इतकी प्रशस्त प्रशिक्षण यंत्रणा स्वतंत्रपुराची नवी ओळख बनावी .या सर्व सोयींचा फायदा आटपाडी तालुक्यातील सामान्य कुटुंबा तील मुले, महिला, युवक, युवती यांनाही मिळावा . यासाठी २० टक्के जागा स्थानीक जनतेसाठी राखून ठेवाव्यात . त्यांना ते कैदी नसले तरी या सुविधा देण्यात याव्यात . या सर्व प्रकल्पांसाठी स्वतंत्रपूर वसाहती शेजारी शेकडो एकर डबई कुरणाची जमीन उपलब्ध आहे. जवळच २५० एम.सी.एफ.टी. चा आटपाडी तलाव आहे . हा तलाव २ टी.एम. सी. क्षमतेचा करण्याइतपत वाव आहे.त्यामुळे स्वतंत्रपुराजवळ हे उपक्रम राबविण्या साठी जमीन आणि पाण्याची कोणतीही कमरता भासणार नाही . स्थानीक आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून २८ खोल्यांची निर्मिती केली गेली आहे .या मानवतावादी संस्कार केंद्रासाठी राज्य सरकारने तातडीने १०० कोटी रुपये उपलब्ध करून जागतिक उंचीचे परिवर्तन साकारावे . कैद्यांमध्ये सामाजीक ,कौटुंबिक वादातून झालेले गुन्हे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्ती ,टोळ्यांनी केलेले गुन्हे असे दोन भाग केले तर किमान सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील कौटुंबीक,सामाजीक गुन्हयातील आरोपी,प्रोफेशनल (सराईत) गुन्हेगारांपासून वेगळे करून त्यांचे जीवनमान सुधारता येईल . आजच्या घडीला जेलमध्ये गेलेला सामान्य व्यक्तीही बाहेर आल्यानंतर काही अपवाद वगळता अधिक मोठा गुन्हेगारच होत आहे.जेल विद्यापीठ अशी संकल्पना त्याबाबत रूढ होवू लागली आहे. यातून समाजातल्या या नकळत गुन्हेंगार बनलेल्यांना सुधारणेच्या प्रक्रियेत आणण्यास मदत करणाऱ्या या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार व्हावा आणि निर्णायक पाऊल टाकले जावे अशी अपेक्षाही सादिक खाटीक यांनी केली आहे .