महापूर रोखण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची देशाला गरज -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महापूर रोखण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची देशाला गरज -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले country needs a river connection project to prevent floods – Union Minister of State Ramdas Athavale
सातारा दि.26 – सातारा,सांगली आणि कोल्हापूर तसेच कोकणात चिपळूण , महाडमध्ये अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली. त्यात मोठी मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली आहे. महापुराच्या नैसर्गीक संकटाला रोखण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला नदीजोड प्रकल्प राबविण्याची देशात गरज आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नदीजोड प्रकल्प राबविण्यास अनुकूल आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आणि पाटण तालुक्यातील दरड कोसळून दुर्घटना झालेल्या गावांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली.त्यानंतर सातारा शासकीय अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले बोलत होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सातारा जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांना दिली भेट
वाई तालुक्यातील कोंडवळे या गावात दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी रिपाइं चे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे, परशुराम वाडेकर, उमेश कांबळे, बापू गायकवाड , विशाल शेलार आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.वाई नंतर पाटण मधील दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेल्या ढोकावळे आणि आंबेघर या दुर्गम भागातील गावांना ना. रामदास आठवले यांनी भेट दिली.
दरडग्रस्त,पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उद्योजकांनी पुढे यावे
दरड कोसळून झालेल्या दुर्घटना आणि सांगली कोल्हापूर तसेच कोकणमधील पुराने झालेल्या हानीची आपण पाहणी केली असून याबाबत केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बॉलिवूडमधील कलाकार, कॉर्पोरेट व्यापारी वर्ग यांनी दरडग्रस्त आणि पुर ग्रस्तांच्या मदतीला पुढे यावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
तांत्रिक कारणाने हेलिकॉप्टर मागे फिरविण्यात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा येथे येऊ शकले नाहीत मात्र त्यांनी यायला पाहिजे होते असे पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ना. रामदास आठवले म्हणाले.
दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अभ्यास समिती नेमून धोकादायक डोंगराचा सर्व्हे करून डोंगरावरील गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.