बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा बारामती येथे समारोप:पुणे जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती – उपमुख्यमंत्री अजित पवार

बजाज पुणे ग्रँड टूर च्या bajaj pune grand tour तिसऱ्या टप्प्याचा बारामतीत समारोप: पुणे जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती – उपमुख्यमंत्री अजित पवार dcm ajit pawar

पुणे ग्रँड टूरमुळे पर्यटन व क्रीडा संस्कृतीला चालना: बारामती येथे विजेत्यांचा गौरव

बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा बारामती येथे समारोप झाला.या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यात दर्जेदार रस्ते,वाहतूक कोंडी कमी व पर्यटनाला चालना मिळाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे,दि.२२,जिमाका वृत्तसेवा- बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यात अडथळे विरहित, सुरक्षित व दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली असून याचा थेट फायदा वाहतूक व्यवस्थेला होत आहे.वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय परिसर, भिगवण रोड येथे बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील विजेत्या सायकलपटूंना उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून या टप्प्याचा समारोप करण्यात आला.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे देश-विदेशातील नागरिकांना पुणे जिल्ह्याची ओळख होत आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा, स्पर्धेचा नियोजित मार्ग, खेळाडूंचे कौशल्य तसेच पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याची क्षमता अधोरेखित होत आहे. नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. स्पर्धेदरम्यान पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांनीही प्रशासनाला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

ग्रामीण भागात महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याने संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. अशा दर्जेदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दरवर्षी आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Back To Top