कोरोना काळात पंढरपूरातील युवकांची प्रेरणादायी साहसी कामगिरी

कोरोना काळात पंढरपूरातील युवकांची प्रेरणादायी साहसी कामगिरी inspiring adventure of youth of Pandharpur during Corona period
  पंढरपूर - गतवर्षी पंढरपूर शहरात कोरोनाची पहिली लाट आली असताना महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी शहरातील अनेक कोरोनाग्रस्त पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना अनमोल सहकार्य केलेले होते.आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांना आपल्या कवेत घेतल्यानंतर संवेदनशील मनाच्या विशाल आर्वे या युवकास स्वस्थ बसवेना.

      कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंताग्रस्त शहरातील परिस्थितीत विशाल आर्वे यांनी कॉटेज हॉस्पिटल/ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरविंद गिराम यांची भेट घेतली आणि रुग्णालयाच्या अडचणींबद्दल आस्थेने विचारणा केली. त्यावेळी डॉ.गिराम यांनी सांगितले की,या सर्व गोष्टी हॉस्पिटलकडे पुरेशा प्रमाणात आहेत.परंतु हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंटवर उपचार करण्यासाठी 50 बेडची क्षमता आहे.इथे आलेला रुग्ण,त्यांचे नातेवाईक यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असते. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे त्यांना परवडत नाही म्हणुन आलेला पेशंट माघारी पाठवायचा नाही व त्यांच्यावर माणुसकीच्या नात्याने उपचार करावयाचे काम आम्ही करत आहोत. सध्या रोज क्षमतेपेक्षा दुप्पट अर्थात शंभर पेशंटवर उपचार करण्याचे काम हॉस्पिटलमध्ये चालु आहे. यामुळे येथील कर्मचारी वर्गावर प्रचंड ताण पडत आहे.  या हॉस्पिटलला अतिरिक्त कर्मचारी देण्यात यावेत,असे आवाहन डॉ.गिराम यांनी केले. 

विशाल आर्वे यांनी पंढरपूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड राजेश भादुले यांच्या माध्यमातून तत्काळ डॉ.गिराम यांची व्यथा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक यांच्यापर्यंत पोहोचवली.

    अतिरिक्त कर्मचारी मिळतील तेव्हा मिळतील, पण तोपर्यंत पंढरपूर शहरातील काही युवकांनी स्वयंसेवक म्हणुन आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती डॉ. गिराम यांनी केली असता, या विनंतीस त्वरीत प्रतिसाद देण्याचे आश्वासन विशाल आर्वे यांनी दिले. दुसर्‍या दिवसापासूनच या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची निर्भयपणे सुश्रूषा करणे,या पेशंटच्या नातेवाईकांना धीर देणे,येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी बंधू- भगिनींचे काम हलके करण्यासाठी त्यांना सर्वोतपरी सहकार्य करणे आदी उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेवत स्वतः विशाल आर्वे,गुरसाळे येथील श्री विठ्ठल प्रशाला व महाविद्यालयात कार्यरत असणारे त्यांचे प्राध्यापक बंधु धनंजय आर्वे, सुनील देशपांडे व अन्य एक मित्र असे चार युवक निस्वार्थी भावनेने स्वयंसेवक / कोरोना योध्दा म्हणून या हॉस्पीटलमध्ये सेवा देण्यासाठी रुजू झाले. 

     या चार युवकांवर शहरातील सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत असून यांच्या या कार्यातून प्रेरणा घेत शहरातील अन्य साहसी युवकांनी उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक बांधिलकीच्या नात्याने स्वयंसेवक म्हणून रुजू होऊन सहकार्य करणे, हि काळाची फार मोठी गरज आहे. स्वयंसेवक म्हणून कार्य करु इच्छिणारे युवकांना या रुग्णालयातील प्रशासनाच्यावतीने मास्क,हॅन्ड ग्लोज,पी.पी.किट,फेस शील्ड आदी सुरक्षा साहित्य दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: