क्रीडा संकुलच्या माध्यमातून जिल्ह्यात आंतराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

क्रीडा संकुलच्या माध्यमातून जिल्ह्यात आंतराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.10:- जिल्ह्यातील तरुणांना विविध खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त क्रीडासंकुलाची निर्मिती करण्यात येत असून, जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे जिल्हा क्रीडा विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडके, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, अपर तहसिलदार तुषार शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, क्रीडा अधिकारी सुनिल धारुरकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार, जयराज मुंढे उपस्थित होते.

यावेळी क्रीडामंत्री श्री बनसोडे म्हणाले, राज्यात चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी शासनाने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले असून,खेळाडूंना केंद्रस्थानी मानून क्रीडा विभागाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वसामान्य होतकरु आणि गरीब कुटुंबातील खेळाडूना शासकीय योजनांचा लाभ मिळवा यासाठी सराव आणि स्पर्धेसाठी आवश्यक ती मदत करुन सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जिल्ह्यात ज्या तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलसाठी जागा उपलब्ध नाही तसेच अपुऱ्या जागा आहेत अशा ठिकाणी कार्यवाही करुन तात्काळ प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी एक कोटी निधीची उपलब्धता असून ज्या संकुलाची कामे चालु आहेत ती कामे दर्जेदार करुन घेण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी दक्ष राहून नियोजित वेळेत पुर्ण करावीत. जिल्ह्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची यादी तयार करावी जेणे करुन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देता येईल अशा सूचनांही क्रीडामंत्री बनसोडे यांनी यावेळी दिल्या.
राज्य शासन सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. ऑलिम्पिक दर्जाचे खेळ, त्यासंबंधीचे प्रशिक्षण खेळाडूंना दिले गेले पाहिजे. यापूर्वी गुजरात, हरियाणा, पंजाब अशा प्रांतातील खेळाडूंसाठी असे भवन उभारून त्यांना अधिक उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी ही सोय व्हावी यासाठी आपण राज्यात ऑलिम्पिक भवन उभे करणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे खेळाडू प्रत्येक खेळात चमकले पाहिजेत. त्या दृष्टीने या खेळाडूंना सरकारची सर्व प्रकारची मदत दिली जाईल. बारा मुद्दे लक्षवेधी आहेत त्याआधारे खेळाडू निवडून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने खेळाडू तयार होण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्याच्या ठिकाणी विविध खेळाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून प्राप्त निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळांडूसाठी खेळाचे मैदान , योगा हॉल, क्रीडा साहित्य,जलतरण तलाव ,वसतीगृह आदी सोयी-सुविधांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: