वृत्तपत्र विक्रेत्याच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचा एक दिवसीय कडकडीत बंद
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०५/२०२५- वृत्तपत्र विक्रेत्याच्या विविध मागण्यांसाठी दि.आज १८ मे रोजी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी एक दिवसीय कडकडीत बंद पाळला. आता तरी प्रशासनाने खडबडून जागे होऊन विक्रेत्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी अपेक्षा सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी व्यक्त केली आहे.

अनेक दिवसांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी याच करता वारंवार वृत्तपत्र प्रशासनाशी पत्रव्यवहार चालू होता. आम्ही आपल्याला सकारात्मक निर्णय देऊ असे सोलापूर मधील मीटिंगमध्ये सांगण्यात आले परंतु त्याचे कार्यवाही पाच मे पर्यंत न झाल्याने जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी दि.१८ मे रोजी वृत्तपत्र विक्री बंद ठेवली जेणेकरून आपला आवाज प्रशासनापर्यंत जावा.
गेल्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्र विक्रेते संघटना आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कमिशन मध्ये वाढ व्हावी, पुरवणी टाकणावळमध्ये वाढ व्हावी यासह इतर मागण्यांसाठी वारंवार जिल्ह्यातील सर्वच वृत्तपत्र वितरण व्यवस्थापकांना जिल्हा संघटनेमार्फत व तालुका संघटनेमार्फत पत्रव्यवहार करूनही या निवेदनांची दखल न घेतल्याने नाईलाजाने १८ मे रोजी बंद पुकारला.नेहमीप्रमाणे भल्या पहाटेपासून वृत्तपत्र विक्रेते सावरकर पुतळ्या समोरील फुटपाथवर जमून बंदबाबत घोषणा देत होते.यानंतर सर्व विक्रेत्यांनी गोपाळकृष्ण मंदिर जवळील सार्वजनिक फलका शेजारी जमून आजचा बंद कशासाठी आहे हे सांगत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

आज संपूर्ण जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाडून वृत्तपत्र व्यवसायातील प्रशासनाचे लक्ष वेधले.यावेळी पंढरपूर शहर व जिल्हा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी वाचकांच्या आजच्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली.काही वाचकांनी पंढरपूरात विक्रेत्यांना भेटून आपला पाठिंबा दर्शवला.

