वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांचे आदेश
आठवड्यात कामाला सुरुवात मंगळवेढा पोलीस–महामार्ग विभागाची संयुक्त पाहणी
मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग विभाग व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून महामार्ग अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या पाहणीत मल्लेवाडी चौक,पंढरपूर रोड बायपास चौक, ढवळस रोड बायपास फाटा, धरमगाव रोड बायपास फाटा, कारखाना रोड बायपास फाटा,मरवडे रोड बायपास चौक, भालेवाडी फाटा,तळसंगी फाटा, सह्याद्री हॉटेल समोर कात्राळ फाटा मरवडे व मरवडे गाव या अपघातप्रवण ठिकाणांचा समावेश होता.
संयुक्त पाहणीदरम्यान प्रितेश पाटील (शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग सोलापूर),पवन कुमार (अभियंता, कंत्राटदार), संबंधित गावांचे सरपंच, पोलीस पाटील,वाहतूक शाखेचे अंमलदार व पोहेकॉ संभाजी यादव उपस्थित होते.
अपघात रोखण्यासाठी दिशादर्शक फलक,रस्ता मार्किंग, गतिरोधक,प्रकाश व्यवस्था आदी उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येणाऱ्या एक आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मंगळवेढा पोलीस स्टेशन हद्दीतील वारंवार अपघात होणारी ठिकाणे ही आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेत. नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राधान्यक्रमाची बाब आहे. त्यामुळे महामार्ग विभाग व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून या सर्व अपघात प्रवण ठिकाणी तातडीच्या व प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.येत्या एक आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन सतत पाठपुरावा करणार आहे -पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे मंगळवेढा






