संजय निरुपम आणि प्रा.संजय मोरे यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कौशल्य विकास केंद्र कल्याण आणि पुण्यातही सुरू करण्यात येणार
क्लस्टर विकसित करून मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्याचा आपला प्रयत्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोरेगाव ,मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या पक्षीय मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना सगळेच संजय हे चांगले नसतात असे नाही. संजय निरुपम आणि प्रा.संजय मोरे यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे, अशी भावना संजय निरुपम यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका,धर्मवीर आनंद दिघे सरकारी नोकरी प्रशिक्षण केंद्र आणि अण्णाभाऊ साठे क्रीडा संकुलातील लाल मातीचा कुस्तीचा आखाडा इतर सोयी सुविधांच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली.

शिवसेनेमध्ये स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून स्वर्गीय सुधीर जोशी यांनी केलेले काम पुढे नेण्याचा प्रयत्न हे दोघे संजय मिळून करत आहेत.घरी अभ्यासाला पुरेशी जागा नसलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी सुरू केलेले केंद्र या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल असे मत व्यक्त केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या अभ्यासिकेला देण्यात आल्याने त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळेल असा विश्वास या समयी व्यक्त केला.
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण गडचिरोली येथे टाटा कंपनीच्या पुढाकाराने कौशल्य विकास केंद्र सुरू केले होते. त्यानंतर तसेच कौशल्य विकास केंद्र कल्याण आणि पुण्यातही सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण धोरण नुकतेच जाहीर झाले असून त्या माध्यमातून सरकारी संस्थांच्या मदतीने क्लस्टर विकसित करून मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्याचा आपला प्रयत्न आहे. लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये दिले असून ही योजना कायम सुरू राहील अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना सहा देशात शिष्टमंडळ नेऊन त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. या अभियानाला देशात चांगला प्रतिसाद मिळतो आहे.पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्या नंतर मी स्वतः तिथे जाऊन अडकलेल्या प्रवाशांना दिलासा दिला आणि सुखरूप परत आणले.त्या हल्ल्यावेळी स्थानिक तरुण आदीलचा मृत्यू झाला.त्याला मदत करण्याचे काम शिवसेनेने केले. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला पक्ष असल्याचेही यावेळी नमूद केले.मात्र इथे राहून पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्यांना क्षमा नाही असेही निक्षून सांगितले.
यावेळी उबाठा गटाच्या माजी नगरसेविका साधनाताई माने यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार मुरजी पटेल, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, उत्तर पश्चिम लोकसभा संपर्कप्रमुख उदय सावंत, विभागप्रमुख स्वप्नील टेम्ब्युलकर, राजुल पटेल, राजू पेडणेकर, अल्ताफ पेवेकर,वैभव भराडकर,ज्ञानेश्वर सावंत तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

