होडी चालक,मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

आषाढी यात्रा: होडी चालक,मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी- जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

आसन क्षमतेपेक्षा जास्त जलप्रवासी वाहतुक करु नये सुर्यास्तानंतर जलप्रवास वाहतुक बंद ठेवावी

पंढरपूर,दि.१०/०६/२०२५ :- आषाढी शुध्द एकादशी दि.०६ जुलै २०२५ रोजी असून यात्रा कालवधी २६ जून ते १० जुलै असा आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान पवित्र मानले जाते.चंद्रभागा स्नानासाठी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते.येणारे भाविक चंद्रभागा नदीत नौका विहार करतात.या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व होडी मालकांनी व चालकांनी होड्यांची नोंदणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिले.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल- रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे होडी मालक व चालक यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे,मंदिर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले,भीमा पाटबंधारे कार्यकारी अभियंता एस.के.हरसुरे,तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे,उप कार्यकारी अभियंता ज्योती इंगोले,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले तसेच होडी मालक व चालक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले की,चंद्रभागा नदी पात्रात होडी मालकांनी व चालकांनी होड्यांची नोंदणी करणे आवश्यक असून, ज्यांनी नोंदणी केली नाही त्या होडी मालकांना व चालकांना चंद्रभागा नदी पात्रात जलप्रवास वाहतुकी साठी परवनगी दिली जाणार नाही.होड्यांना मिळालेला नोंदणी क्रमांक ठळक अक्षरात लावावा.वारी कालावधी अगोदर आपल्या होडींची दुरुस्ती करुन घ्यावी व वेळोवेळी देखभाल करावी. आपली होडी प्रवासी वाहतुक करण्यासाठी योग्य असल्याची खात्री करुन त्याबाबतचे हमीपत्र द्यावे.योग्य आसन क्षमता प्रवासी व चालक, मालक सहित निश्चित करावी. जलप्रवासी वाहतुकीचे वेळापत्रक निश्चित करावे, सुर्यास्तानंतर जल प्रवासी वाहतुक करु नये. होडीत लाईफ जॅकेटची उपलब्धता ठेवावी. नगरपालिका प्रशासनाने मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेटची उपलब्धता करुन द्यावी.पाटबंधारे विभागाने भाविकांसाठी होड्यांना जलप्रवासी वाहतुकीची चढण्याची व उतरण्याची ठिकाणे निश्चित करुन द्यावीत. त्या ठिकाणी पाटबंधारे,पोलीस व नगर पालिका विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी जेणेकरुन प्रवासी संख्या देखील आसन क्षमतेनुसार राहिल असेही जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.

वारी कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात साधारणत: ६ ते ८ हजार क्युसेक इतका विसर्ग आल्यास जलप्रवासी वाहतुक पुर्ण बंद ठेवावी.प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.पूर परिस्थिती निर्माण झाल्यास भाविकांना नदी पात्रात जाण्या पासून परावृत्त करावे. यापूर्वीही चंद्रभागा नदी पात्रात भाविकांच्या सूरक्षेबाबत होडी चालक,मालकांचे प्रशासनास चांगले सहकार्य लाभले असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top