आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगवल्ली- योगिनी समवेत योग
बायोस्फिअर्स संस्थेचा सिद्धबेट आळंदी येथे अनोखा उपक्रम
पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. २१/०६/२०२५- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माऊली हरित अभियाना अंतर्गत बायोस्फिअर्स संस्थेच्या संकल्पनेतून या वर्षी शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी सिद्धबेट-आळंदी येथे योगवल्ली-योगिनी समवेत योग असा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. योगसाधना, योगिक मुद्रा, योगाचे मानवी जीवनातील महत्व, शंखनाद, अजानवृक्ष पूजन, सामुदायिक पसायदान, पर्यावरणाचा जागर आणि औषधी वनस्पतींचे रोपण अशा विविध विषयांची सांगड घालत योगदिन मोठ्या उत्साहात योग-साधक, पर्यावरण अभ्यासक, वारकरी, विद्यार्थीवर्ग, जनसामान्य यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

बायोस्फिअर्स संस्था, आळंदी नगरपरिषद,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी-आळंदी देवाची, केळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साधनास्थळी सिद्धबेट, श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित करण्यात आला होता.
या योगसाधना कार्यक्रमप्रसंगी साधकाश्रमाचे डॉ. यशोधन महाराज साखरे, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.हरिदास शास्त्री पालवे,मूळ स्पेन देशाच्या नागरिक आणि साधक श्रीमती निशामाह पिलर संतोस, प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.संतोषानंद शास्त्री- वृंदावन यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ.सचिन अनिल पुणेकर, संत- साहित्याचे लेखक दत्तात्रय महाराज गायकवाड, जल-अभ्यासक शैलेंद्र पटेल, अध्यात्माचे गाढे अभ्यासक गिरीश गोखले, वसिम मुलाणी, श्रीमती सुरेखा गायकवाड, कुमारी भक्तीप्रिया पालवे व साधक-विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. साखरे यांनी सिद्धबेट हे योग-साधनेचे भारतातील प्रमुख योगकेंद्र व्हावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. शिवाय डॉ. पुणेकर यांच्या मते योगवल्लीचे रोपण, जतन-संवर्धन भारतातील बहुतांश योग केंद्रात साधकाला उचित लाभ व्हावा या उद्देशाने करावे.
सामूहिक पसायदान व वृक्षारोपणाने उपक्रमाची सांगता झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गायकवाड यांनी केले. प्रस्तावना डॉ.सचिन पुणेकर यांनी केली.