मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध-आ.समाधान आवताडे

जास्तीत जास्त शेतक-यांनी कृषि विभागामार्फत तूरीचे बियाणे प्राप्त करुन पेरणी करावी -आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०६/२०२५ – सध्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी मंगळवेढा कृषी कार्यालयाकडे तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध झाले आहे तरी तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून या चांगल्या प्रतीच्या बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की,केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात संपुर्ण देशात कडधान्य मिशन राबविण्याची घोषणा केली आहे.हे मिशन पुढील सहा वर्षासाठी असेल.केंद्रिय कृषि मुल्य आयोगा मार्फत खरीप सन २०२५-२६ साठीचे हमीभाव जाहीर करण्यात आले असून सर्व कडधान्याच्या हमीभावां मध्ये ५ टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे.तूर पिकाचा हमीभाव मागील ७ हजार ५५० रुपये प्रती क्विंटल वरून ८ हजार रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे.तसेच उडीद पिकाचा हमीभाव मागील ७ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल वरून ७ हजार ८०० रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे.शेतक-यांकडून कडधान्याची नाफेड ,एनसीसीएफ खरेदी करणार आहे. या दोन एजन्सीकडे नोंदणी केलेल्या शेतक-यांची संपुर्ण तूर व उडीद खरेदीची शाश्वती देण्यात आली आहे. कृषि विभागामार्फत तूरीच्या वाढीच्या अवस्थे दरम्यान विविध शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात किड व रोगाच्या व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी कृषि विभागामार्फत तूरीचे बियाणे प्राप्त करुन पेरणी करावी असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती सांगताना तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी सांगितले की तुरीचे (वाण – भिमा) बियाणे उपलब्ध झाले आहे.सदर तूर लाल रंगाची असून बागायत व जिरायत दोन्ही प्रकारे पाण्याचा निचरा होणा-या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये लागवडीसाठी योग्य आहे.दोन ओळीतील अंतर ६ फुट व दोन रोपातील अंतर २ फुट तसेच दोन ओळीतील अंतर ५ फुट व दोन रोपातील अंतर २ फुट लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते तसेच एकरी ७००-९०० ग्रॅम बियाणे पुरेसे आहे. कृषि विभागामार्फत वाटप करण्यात येणारे बियाणे ४ किलो पॅकिंग मधील असून
एका बॅग मध्ये ५ एकर तूरीची पेरणी होवू शकते.तुरीचे भिमा वाण १० जुलै पर्यंत लागवडीसाठी फायदेशीर असून योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळू शकते. तूर पेरणी वेळी प्रती किलो बियाण्यास १० ग्राम ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया केल्यास मर रोगाचे प्रमाण आटोक्यात राहते त्याचबरोबर जैविक जिवाणू संघाची प्रती किलो बियाण्यास १० मिली बीजप्रक्रिया केल्यास उत्पन्न १० ते २० टक्के वाढू शकते.पेरणी करताना एकरी ५० किलो डिएपी खताची मात्रा द्यावी.बियाणे उगवून आल्यानंतर पहिल्या २० ते ३० दिवसाच्या आत रोपांची विरळणी करुन रोपातील अंतर ६२ किंवा ५२ राहिल याची दक्षता घ्यावी.विरळणी झाल्यानंतर ५ टक्के निंबोळी अर्क व २ टक्के युरियाची फवारणी करावी. पहिली छाटणी ४०-४५ दिवसात व दुसरी छाटणी ६० ते ६५ दिवसात करुन घ्यावी.इच्छूक शेतक-यांनी संबंधीत गावच्या कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्रीमती मनिषा मिसाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top