सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- सीना-माढा उपसा सिंचन योजना ही माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरली असती परंतु गेली २० वर्षे ही योजना केवळ कागदांपुरतीच मर्यादित आहे.२७ मे २००५ रोजी मंजूर झालेल्या या योजनेतून २४,५५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचे उद्दिष्ट होते मात्र आज पर्यंत केवळ १६,१५१ हेक्टर क्षेत्रालाच पाणी मिळू शकले आहे.ही स्थिती अतिशय गंभीर असून शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारी आहे.
२० वर्षांपूर्वी बसवलेल्या मोटारी आता निष्क्रिय झाल्या असून पाण्याचा पुरवठा अपेक्षित ४५०/५०० क्यूसेक्स ऐवजी केवळ ३०० क्यूसेक्सवर आला आहे.यामुळे शेतकरी वारंवार अडचणीत येत आहे. मातीखाली टाकलेल्या पाइपलाइनमध्ये वारंवार गळती होऊन पाणी वाया जात आहे.
आजच्या घडीला संपूर्ण मोटर्स बदलणे,६ किमी रायझर लाईन जमिनीवरून नव्याने बांधणे,उर्वरित २३६ हेक्टर भू-संपादन तातडीने पूर्ण करणे आणि योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रस्तावित सुप्रिमा त्वरित मंजूर करणे आवश्यक आहे.

या दिरंगाईचा परिणाम गावांवर होतो आहे. तुळशी गाव फक्त २३० मीटर पाइपलाइन अभावी कोरडं पडले असून, लग्नासारखे सामाजिक व्यवहार ठप्प आहेत.बावी गावाने २००४ साली १००% मतदान करूनसुद्धा आजही पाण्याची वाट पाहावी लागते आहे.
शेतकऱ्यांचे दुःख थांबवण्यासाठी त्यांचं भविष्य अंधारमय होऊ नये यासाठी या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यास मंजुरी मिळवून पाणी प्रत्यक्षात शेतापर्यंत पोहोचवणं हीच आमची ठाम आणि तातडीची मागणी आहे.