विषारी वनस्पती पाला खाऊन मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या-शेळ्या घटनास्थळी आ समाधान आवताडे यांनी भेट देत केली आस्थेने विचारपूस
माणुसकीच्या काळजाचा कप्पा पाणावणाऱ्या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – पारंपरिक मेंढपाळ असणारे जत तालुक्यातील काही मेंढपाळ आपल्या मेंढ्या-शेळ्या चरण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागामध्ये आले असता या भागातील निंबोणी येथील जंगलातील विषारी वनस्पती पाला खाल्याने तब्बल मेंढ्याची ६० लहान पिल्लं व २० शेळ्या जागीच मृत्यूमुखी पडल्याने या मेंढपाळयांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहिती युवक नेते आकाश डांगे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना देताच आमदार आवताडे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांच्या मार्फत संबंधित लोकांना संपर्क करत घटनास्थळी भेट दिली. या भेटीप्रसंगी झालेलं पशुधन नुकसान आणि मेंढपाळांची अवस्था पाहून आ.आवताडे यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी वन विभाग अधिकारी शितल साठे व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ भाले यांच्याशी संपर्क करुन उर्वरित बाधीत जनावरांना आवश्यक योग्य उपचार करुन मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचे पंचनामे करुन सर्वोतोपरी मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.ऊन,वारा,पाऊस,निवारा यांची कोणतीही तमा न बाळगता आपली दैनंदिन रोजीरोटी भागवण्यासाठी हे लोक वर्षभर आपला पाठीवरचा संसार सोबत घेऊन भटकंती करत असतात.अशा सर्व परिस्थितीमध्ये असे अस्मानी संकट ओढवणे हे त्यांच्या मानसिक जीवन प्रवासाला हादरवून सोडणारे संकट आहे.झालेली सदर अतीव दुःखाची घटना पहिल्यानंतर एक मेंढपाळ जागेवरच कोसळून पडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बांधलेल्या अनुमानानुसार आणि केलेल्या चर्चेअंती झालेले एकूण नुकसान जवळपास २० लाखाच्या घरात आहे.त्यामुळे कधीही भरून न येणारी अर्थिक हानी झाल्याने या लोकांची प्रापंचिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे.या घटनेने या भागासह पूर्ण मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेने हळहळ व्यक्त केली आहे.
सदर घटना घडल्याचे समजल्यानंतर आम्ही तात्काळ कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार समाधान आवताडे यांच्याशी संपर्क करुन या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली असता त्यांनी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी भेट देऊन संबंधित वन प्रशासकीय व पशुआरोग्य यंत्रणा यांना योग्य ते सूचना देत कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने या लोकांना मोठा धीर मिळाला आहे.त्याचबरोबर आमदार आवताडे यांचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशीही घडलेल्या घटनेबद्दल भ्रमणध्वनीद्वारे बोलणे झाले आहे – युवक नेते आकाश डांगे, नंदेश्वर