ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांचे आवाहन
पंढरपूरात नक्शा प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू
पंढरपूर /उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज :- केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत पंढरपूर नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून प्रत्येक मिळकतीचे नकाशीकरण व माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे.नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सातबारा उतारे, खरेदीखत व मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर जमाबंदी आयुक्त तथा भूमि अभिलेख अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या नक्शा प्रकल्पांतर्गत पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील मिळकतींची नगर भूमापन मोजणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करून मिळकत पत्रिकेच्या स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचे काम सुरू झाले असून नक्शा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा अप्पर जमाबंदी आयुक्त तथा भूमि अभिलेख अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी घेतला.
यावेळी भूमी अभिलेख उपअधीक्षक पुजा आवताडे, परिक्षण भुमापक नवनाथ राऊत, सायबर स्विफ्ट इन्फोटेक कंपनीचे ऋषीकेश देशमुख, भूमी अभिलेख विभागाचे अक्षय यादव उपस्थित होते.

भूमि अभिलेख अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले ‘नक्शा’ प्रकल्प केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भू-संसाधन विभागामार्फत देशभरातील 152 शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 10 नगरपालिकांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, त्यामध्ये पंढरपूरचा समावेश आहे.पंढरपूर शहरातील मिळकतीचे ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवाई सर्वेक्षण करून अचूक नकाशे तयार केले जात आहेत.त्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मिळकतींची पडताळणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे भूमालकीबाबतची स्पष्टता वाढेल, भूविकास प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवता येईल.तसेच कर आकारणी अधिक अचूक होईल,मालमत्ता व्यवहार सुलभ होतील आणि शहरी नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल.
पंढरपूर नगरपरिषद व भूमी अभिलेख विभाग संयुक्तपणे प्रकल्पाची अंमलबजावणी करीत असून नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही प्रक्रिया यशस्वी होणार आहे , असेही भूमि अभिलेख अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी सांगितले.
