लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची दिशा
विरोधक दिशाभूल करत असले तरी महिलांचा आत्मसन्मान अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑगस्ट २०२५ : दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले.महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या अधिवेशनात भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात महाराष्ट्राने दिलेल्या अद्वितीय योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की,विठ्ठलभाई पटेल यांनी २४ ऑगस्ट १९२५ रोजी दिल्ली विधानसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला होता.त्याच्या शताब्दी निमित्ताने आयोजित या परिषदेत लोकशाहीचे महत्त्व,कृत्रिम बुद्धिमत्तेची आव्हाने तसेच स्वातंत्र्य लढ्या तील विविध सेनानींचे योगदान अधोरेखित करण्यात आले.मी महाराष्ट्राच्या वतीने हुतात्मा राजगुरू जयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अधिवेशनात वीर सावरकर, अरुणा आसफ अली,उषा मेहता,जयप्रकाश नारायण, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

या अधिवेशनात महाराष्ट्राच्या वतीने केलेल्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर झालेल्या सीपीएच्या संध्याकाळच्या बैठकीत दिल्ली विधानसभा वाचनालयातील उपयुक्त साहित्य महाराष्ट्र विधानसभेत उपलब्ध करून देण्याबाबत चर्चाही झाली.
पत्रकारांशी संवाद साधताना डॉ.गोऱ्हे यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत विशेष भाष्य केले.त्या म्हणाल्या,शिवसेना महिला आघाडीच्या बैठकींतून आम्ही महिलांचा आवाज ऐकून शासनापर्यंत पोहोचवला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रयत्नांतून या योजनेतून महिलांना थेट दीड हजार रुपयांचा निधी मिळत आहे.हा निधी ही फक्त सुरुवात असून पुढे आणखी उपयुक्त स्वरूपात ही योजना विकसित होणार आहे. महिलांच्या क्रेडिट बँकची सुरूवात झाली आहे.काहींना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळाल्यास त्यावर कार्यवाही सुरू आहे. परंतु काही विरोधक महिलांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.
उपसभापती डॉ नीलम गोर्हे पुढे म्हणाल्या की,लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळतो आहे.अनेक बँका,आमदार, पालकमंत्री सहकार्य करत आहेत.महिलांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य आणि कुटुंबाचा वाढलेला सन्मान हीच या योजनेची खरी यशोगाथा आहे.शिवसेना महिला आघाडी ही योजना प्रत्येक भगिनींपर्यंत पोहोचवण्यास सक्रियपणे काम करत आहे.ही योजना महिलांच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी नक्कीच मोलाची ठरणार आहे.

