मराठा स्मारक स्तंभ,चेलाडी नसरापूर भोर येथे स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व शिवभक्तांच्या माध्यमातून होणार साफसफाई मोहीम
भोर /ज्ञानप्रवाह न्यूज –बारा मावळातल्या मावळ्यांचे श्रद्धास्थान स्फुर्तीस्थान म्हणजे शककर्ते शिवछत्रपती. स्वराज्यभूमी भोर मधील सर्व शिवपाईक यांनी स्वच्छता मोहिमेसाठी संस्थाकालीन दुर्लक्षित पण अत्यन्त महत्वाचे ठिकाण निवडलं आहे आणि ते म्हणजे चेलाडी – नसरापूर जवळील मराठा स्मारक स्तंभ.भोरपासून उत्तरेस २० किमी व पुण्यापासून ३५ किमी वर असलेले हे स्वराज्य स्थापनेचे प्रतिक असणारं बहुदा महाराष्ट्रातील एकमेवद्वितीय स्मारक.

स्वातंत्र्यपूर्वकाळच्या पुणे येथील हिंदवी स्वराज्य स्मारक मंडळाच्या साहित्यसम्राट न चि केळकर,प्रो.दत्तो वामन पोतदार,सह्याद्री चे संपादक दिनकर वि.काळे व हिंदुस्थान सरकार पुराणवास्तू संशोधन खात्याचे सेवानिवृत्त डायरेक्टर जनरल रावबहादूर काशिनाथ नारायण दीक्षित या सदस्यांनी भोर संस्थान अधिपती रघुनाथराव पंतसचिव राजेसाहेबां जवळ हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या त्रिशतकीयपूर्तीनिमित्त स्मारकाची कल्पना मांडली त्यातून २७ मे १९४५ रोजी पायाची शिळा बसवून भूमिपूजन केले गेले तसेच स्मारकाचे उद्घाटन २६ मार्च १९४९ रोजी तत्कालीन मुंबई प्रांताचे पंतप्रधान बाळासाहेब खेर यांच्या हस्ते झाले.

स्मारकाचे बांधकाम १२x१२ फूट असून २५ फूट उंच दगडी स्तंभ आहे.हा स्तंभ पायाशी चौकोनी,मध्ये अष्टकोनी, त्यावर गोलाकार व शेवटी कलश त्यात आंब्याच्या पानात नारळ अशा स्वरूपाचा आहे.
स्मारकावर दोन बाजूंस ढाल तलवार, धनुष्यबाण व भाता ही शिवकालीन आयुधे, दुसरीकडे स्वराज्यशपथ प्रसंग व अस्सल शिवमुद्रा संगमरवरी दगडात कोरली आहे. स्मारकाच्या कट्ट्यावर भोर तालुक्या जवळील प्रमुख ऐतिहासिक ठिकाणांची अंतरे कोरली आहेत.

मराठ्यांच्या गतवैभवाचे स्मरण येणाऱ्या पिढीला निरंतर होत राहावे व त्यातून नवचैतन्य व स्फूर्ती उत्पन्न व्हावी हा या स्तंभ उभारण्यामागचा उद्देश होता.सर्वांनी नक्की या स्मारकाला भेट द्यावी तसेच भोरचा अमूल्य ठेवा असणाऱ्या या स्मारकाचा जीर्णोद्धार व संरक्षित होणे काळजी गरज आहे अशी भावना स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण, आम्ही शिवपाईक बारा मावळचे यांनी व्यक्त केली आहे.