पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव

पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव

देशभरातील ५१ चेंजमेकर सदस्यांमध्ये तेजस घाडगे यांचा समावेश

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१६: प्रभा हिरा प्रतिष्ठान पंढरपूर संचलित पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस घाडगे यांना नुकतेच राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. गुजरातमधील बनास डेअरी येथे पार पडलेल्या प्रथम राष्ट्रीय चेंजमेकर परिषदेत हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते तेजस घाडगे यांना प्रदान करण्यात आला.

देशभरातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशां मधून विविध क्षेत्रात समाज परिवर्तन घडवणाऱ्या ५१ समाजपरिवर्तकांचा (चेंजमेकर्स) या परिषदेमध्ये गौरव करण्यात आला.

समन्वय प्रतिष्ठान वडोदरा यांच्या पुढाकाराने व इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गुजरात विधानसभा अध्यक्ष व बनास डेअरीचे चेअरमन शंकर चौधरी, इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.राम माधव, आयएएस एम.नागराजन,माजी शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चूडासमा,झायडेक्स ग्रुपचे चेअरमन डॉ.अजय रांका आदी मान्यवर उपस्थित होते.तर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती दर्शवली.

पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव

तेजस घाडगे हे पालवी संस्थेच्या माध्यमातून मागील १५ वर्षांहून अधिक काळ सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. मेडिकल व सायकिएट्रिक सोशल वर्क या शाखेत मास्टर्सचे (MSW) शिक्षण घेतले आहे. तेजस यांनी समुपदेशन, जनसंपर्क, निधी उभारणी व प्रकल्प नेतृत्व या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तेजस हे पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगलताई शहा यांचे नातू व सहसंस्थापक आई डिंपल घाडगे यांची तिसरी पिढी म्हणून संस्थेत कार्यरत आहेत.त्यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करणे, युवकांमध्ये जनजागृती करणे व पालवीचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचवणे या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

पालवी प्रकल्पामध्ये सध्या एचआयव्ही सहज जगणारी बालके, युवक युवती व महिला यांना सुरक्षित निवास, अन्न, शिक्षण, औषधोपचार,व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. मागील २५ वर्षांत सुमारे पाचशेहून अधिक लाभार्थींपर्यंत संस्था पोहोचली आहे.पालवी ज्ञानमंदिर शाळा, संजीवनी आरोग्य केंद्र, अपना घर, पालवी नवनीत,पालवी श्री नैवैद्यम सेवा अशा ९ प्रमुख प्रकल्पांतून संगोपन, शिक्षण, अन्नदान व स्वावलंबनाची दिशा दिली जात आहे.

हा पुरस्कार फक्त माझा नाही तर पालवीच्या सेवाभावाचा गौरव आहे.एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलं-महिलांसाठी समर्पित २५ वर्षांचा अविरत कार्याचा हा सन्मान आहे. हा क्षण महाराष्ट्रासाठी व सर्व हितचिंतक देणगीदारांसाठी अभिमानाचा आहे.या राष्ट्रीय पुरस्कारामुळे आणखीन जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे – तेजस घाडगे समन्वयक पालवी संस्था पंढरपूर

Leave a Reply

Back To Top