मनाचे श्लोक नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान
चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – हिंदु जनजागृती समितीचा इशारा
मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या मनाचे श्लोक या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. हा समर्थ रामदास स्वामींचा अपमानच आहे. उच्चतम नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे हा कोट्यवधी श्रीराम भक्तांच्या आणि समर्थ भक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. संतपरंपरेचा हा अपमान हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. जर या चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले नाही तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन मनाचे श्लोक हे पवित्र नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

सुनील घनवट पुढे म्हणाले की,या संदर्भात समितीच्या वतीने शासन व सेन्सॉर बोर्डाला निवेदन देण्यात येणार असून संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठवली जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कुराण किंवा बायबल यांसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरून चित्रपट बनवण्याचे धाडस करेल का ? आणि जरी केले तरी सेन्सॉर बोर्ड त्याला परवानगी देईल का ? मग केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना वारंवार का दुखावल्या जातात ? यापूर्वी द डा विंची कोड आणि विश्वरूपम यांसारख्या चित्रपटांमुळे अनुक्रमे ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याने अनेक राज्यांत त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती.या चित्रपटाच्या बाबतीतही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असतील.
घनवट पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने लाल बाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृतपाल सिंग [(2015) 16 SCC 795] या खटल्यात स्पष्ट केले आहे की,रामायण सारख्या पवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी मक्तेदारी म्हणून करता येत नाही.या तत्त्वानुसार मनाचे श्लोक हे नाव चित्रपटासाठी वापरणे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या विरोधात आहे.भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ नुसार हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे हा एक गंभीर, दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे तसेच सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२च्या कलम ५-ब नुसार सामाजिक सलोखा आणि नैतिकता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची आहे.मनाचे श्लोक हे शीर्षक चित्रपटातून त्वरित आणि बिनशर्त मागे घ्यावे.केंद्र आणि राज्य शासनाने भविष्यात अशा प्रकारे धार्मिक प्रतीकांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कायदा करावा.