कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य- प्रांताधिकारी सचिन इथापे


पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 :- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि.02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून यात्रा कालावधीत 65 एकर (भक्ती सागर),चंद्रभागा नदी पात्र, दर्शन रांग,प्रदक्षिणा मार्ग व मंदीर परिसर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते.यात्रेत भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून गर्दी व्यवस्थापनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे.तसेच भाविकांच्या आरोग्य सुविधे सह स्वच्छतेला प्राधान्य देवून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.


कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी अमोल जाधव,मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक धोत्रे यांच्यासह संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले,यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेबाबत नगरपालिका व मंदिर प्रशासनाची महत्वाची जबाबदारी आहे.या कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा,वाळवंटातील तसेच शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत.वाळवंटात पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे,धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत.अनाधिकृत फलक काढावेत.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग,नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी.कार्तिकी यात्रा कालावधीत मंदीर समितीने जादाचे पत्राशेड,जर्मन हॅगर उभारावेत,दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. मंदीरात तसेच मंदीराभोवती करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईचे फायर ऑडीट व स्काय वॉकचे स्ट्रॅक्चरल ऑडीट करुन घ्यावे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपुर्ण कामे तात्काळ पुर्ण करावीत,चंद्रभागा बस स्थानकात बसेसना जाण्या येण्यासाठी तात्काळ रस्ता करावा.एस.टी महामंडळाने प्रवाशी वाहतुकीचे नियोजन करुन बस स्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात.कार्तिक यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असल्याने पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय पथकांची नेमणूक करावी. तसेच संबधित विभागाने जनावरांच्या व पशुपालकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.अन्न व औषध प्रशासनाने शहर व परिसरातील खाद्य पदार्थाच्या दुकानांची तपासणी करावी, अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या.



