डॉक्टर असूनही असह्य वेदनेने आत्महत्या…


ही केवळ वैयक्तिक नाही,समाजाची सामूहिक हार – डॉ.नीलम गोऱ्हे

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी उपसभापतींची ठाम भूमिका

सातारा,दि.२४ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.आपल्या हातावर लिहिलेल्या आत्महत्येच्या पत्रात तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत.या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गहिवरलेल्या भावनेने प्रतिक्रिया देत ही केवळ एका महिलेची नाही तर संपूर्ण समाजाची वेदना आहे,असे म्हटले आहे.

डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,एका डॉक्टरने इतके टोकाचे पाऊल उचलणे हे वेदनादायक आहे.पोलीस अधिकाऱ्यांवर असे गंभीर आरोप होणे,ही संपूर्ण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.या घटनेचा सखोल आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे.
त्यांनी स्पष्ट केले की मृत्यूपूर्वी लिहिलेला मजकूर न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरतो.त्यामुळे या प्रकरणातील फॉरेन्सिक तपास,कॉल रेकॉर्ड्स आणि साक्षीदारांची चौकशी पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
मी स्वतः डॉक्टर असल्याने त्या मानसिक वेदनेची कल्पना करू शकते.पण मृत्यू हा कधीच पर्याय नसतो.समाजात संवाद आणि समुपदेशनाची संस्कृती वाढवण्याची ही वेळ आहे,असे सांगत त्यांनी महिलां साठी कार्यरत आयोग आणि संस्थांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महिला सुरक्षा व मानसिक आरोग्याच्या सुविधा अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आरोपीला बडतर्फ करण्याची मागणी केल्याचेही नमूद केले.

