श्रीमती कळंत्रे अक्कांनी उजाड वाळवंटात लोकसेवेचे मळे फुलविले..

श्रीमती कळंत्रे अक्कांनी उजाड वाळवंटात लोकसेवेचे मळे फुलविले..

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या चेअरमन स्व.कळंत्रे अक्कांचा ३० वा स्मृतिदिन… त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

ज्ञानप्रवाह न्यूज- कृष्णाकाठावर औरवाड येथे २२ नोव्हेंबर १८९६ रोजी दुग्गे घराण्यात श्रीमती कळंत्रे अक्कांचा जन्म झाला.वयाच्या १५ व्या वर्षी आष्ट्याचे चारुदत कळंत्रे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि विवाहानंतर पाचच महिन्यात त्यांच्यावर वैधव्याची कुर्‍हाड कोसळली.स्व.दि.ब. अण्णासाहेब लठ्ठे यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा लग्न न करता सारी हयात महिलांच्या उन्नतीसाठी व्यतीत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि पुण्याला हिंगणे येथील कर्वे यांच्या आश्रमात दाखल होऊन मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सांगलीत आल्या.

१९२२ साली दक्षिण भारत जैन सभेने सांगलीत महिलाश्रम/श्राविकाश्रमाची स्थापना केली.श्रीमती कळंत्रे अक्कांनी त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्या संस्थेचा संपूर्ण विकास केला.

विधवा,सधवा,परित्यक्ता,निराधार महिलांचे माहेरघर म्हणून आश्रमाची ख्याती झाली ती श्रीमती कळंत्रे अक्कांच्या ममतामयी कामाने.१९३४ साली अक्कांनी ब्रह्मदेशाचा अभ्यास दौरा केला.म.गांधी शिशुविहार, प्रॅक्टीसिंग स्कूल व कस्तुरबा अध्यापिका विद्यालय या तीन शिक्षण शाखा लठ्ठे एज्युकेशन सोसायटीला देऊन संस्थेचा पाया भक्कम केला. सांगली हायस्कूल ही नामांकित माजी शासकिय तंत्रमाध्यमिक शाळा खूप मेहनतीने स्व.प्राचार्य जी.के. पाटील व द.भा.जैन सभेच्या त्यावेळच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने लठ्ठे एज्युकेशन सोसायटीला मिळवून दिली. याकामी त्यांनी स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील यांचा उपयोग करून घेतला.१९७६ मध्ये सोलापूर समाचारचे सहसंपादक पांडुरंग काळे यांनी श्रीमती कळंत्रे अक्कांचे एक छोटेसे चरित्र लिहिले होते.ते धन्यकुमार जव्हेरी यांनी प्रसिद्ध केले होते.त्या चरित्राला महाराष्ट्राचे तत्कालीन वीज व पाटबंधारे मंत्री स्व.वसंतदादा पाटील यांनी प्रस्तावना दिली होती.त्यामध्ये त्यांनी श्रीमती कळंत्रे अक्कांच्या चौफेर कामाबद्दल गौरवोद्गार काढताना अक्कांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,उजाड रखरखीत वाळवंटातून लोकसेवेचे मळे फुलविले आहेत असे म्हटले आहे यावरून या माऊलीचे मोठेपण अधोरेखित होते.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकनियुक्त सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आले, त्यावेळी सांगली संस्थानातील आमदार म्हणून महाराष्ट्र विधिमंडळात केंद्र सरकारने श्रीमती कळंत्रे अक्का यांची नियुक्ती केली.त्यानंतर १९५२मध्ये विधान सभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या दोघा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करून मिरज मतदार संघातून त्या निवडून आल्या.विधानसभेत श्रीमती कळंत्रे अक्कांनी विधवा व अज्ञान मुलांना कुळकायदा लागू करु नये हा खास ठराव संमत करवून घेतला.

१९५७ मध्ये त्यांनी मुंबई येथे जाऊन तेथील श्राविकाश्रमाची सुत्रे हातात घेऊन आश्रम पुन्हा नावारूपाला आणला. सामाजिक कामाची तळमळ, जबरदस्त व्यवस्थापन कौशल्य आणि मोठा जनसंपर्क या गुणांमुळे त्या लोकप्रिय झाल्या. १९६८ मध्ये स्व. वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा ७१ वा वाढदिवस मुंबईत भव्य प्रमाणात साजरा झाला.आचार्यरत्न देशभूषण महाराजांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.त्यांना विद्वदरत्नचंद्रिका ही बहुमानाची पदवी बहाल करण्यात आली.१९७५ मध्ये त्यांना उत्तर अमेरिकेतील शाकाहारी परिषदेने जागतिक परिषदे साठी आमंत्रित केले होते. आक्का पुरोगामी विचाराच्या होत्या. धर्माचे थोर तत्त्वज्ञान कृतीत उतरवून दुसर्‍याचे दुःख दूर करणार्‍या आक्का या खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध, भगवान महावीरांच्या वारसदार ठरतात. त्यांनी केवळ जैन समाजातील स्त्रियांचा नव्हे तर बहुजन समाजातील स्त्रीवर्गाचा विकास केला.त्यांचे जीवन म्हणजे गेल्या शतकातील स्त्रियांच्या प्रगतीचा व स्थित्यंतराचा इतिहास आहे.

श्रीमती कळंत्रे अक्का या एकनिष्ठ गांधीवादी कॉंग्रेस नेत्या होत्या.सांगली जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले.सांगली नगरपालिका उपाध्यक्ष या नात्याने सांगलीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.ग्रामीण विकास व खादीचा प्रसारासाठी त्या झटल्या. स्वकर्तृत्वाने त्यांनी लोकमान्यता मिळवली.त्या झुंजार कणखर होत्या.लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या स्थापना व विकासात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.द.भा.जैन सभेने त्यांचा सन्मान केला.सभेच्या महिला परिषदेसाठी श्रीमती कळंत्रे अक्कांचे मोठे योगदान आहे.

सभेने त्यांना शिरगुप्पी अधिवेशनात कर्मवीर पुरस्कार देऊन त्यांचा बहुमान केला. वर्षानुवर्षे अथक परिश्रमातून त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या.व्यक्तिगत जीवनाचा कधीच त्यांनी विचार केला नाही.९९ वर्षे त्या झिजल्या.अखेरच्या विश्रांतीसाठी त्यांनी कोणत्याही संस्थेचा आधार घेतला नाही.

श्रीमती कळंत्रे अक्का यांच्या बहिणीचे जावई बी.ए.पाटील यांच्या घरी इचलकरंजी येथे त्या राहिल्या त्यावेळी सौ.प्रगती पाटील व बी.ए.पाटील कुटुंबियांनी त्यांची अत्यंत श्रद्धेने शुश्रूषा केली.त्यांच्या भगिनी सुशीला मिठारे या त्यांच्या सोबतीला राहिल्या.

ता. ६ नोव्हेंबर ला श्रीमती कळंत्रे अक्का यांची तब्येत बिघडली आणि दुःखद निधन झाले.त्यांच्या निवासस्थानी जाऊन दक्षिण भारत जैन सभेने त्यांना आदरांजली वाहिली.त्यावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी च्यावतीने तत्कालीन चेअरमन ॲड.एस. एस.पाटील,मी,इचलकरंजे व चौधरी मॅडम यांनी जाऊन श्रीमती कळंत्रे अक्कांना श्रद्धांजली वाहिली.त्यांचा पार्थिव देह सांगलीचे श्राविका श्रमात काही वेळ दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. कृष्णा काठावर जन्मलेली ही माऊली सांगलीत कृष्णाकाठावर अमरधाम येथे विसावली त्यावेळी अक्कांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्याची नोंद घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शासकीय प्रतिनिधी पाठवून आकाशवाणी वर शासनाच्यावतीने श्रीमती कळंत्रे अक्कांना श्रध्दांजली वाहिली.

अक्कांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन…

लेखक – प्रा.एन.डी.बिरनाळे,कार्यकारी संपादक, दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र प्रगती आणि जिनविजय सांगली मो.नं. ८८८८४७५५५२

Leave a Reply

Back To Top