नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करा- केंद्रीय नागरी व वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ


नवलेपुल अपघातानंतर केंद्राचा मोठा निर्णय — मोहोळ यांचे प्रशासनाला कडक आदेश

नवलेपुलावर केंद्राची धडाकेबाज अॅक्शन—वेगमर्यादा अर्धी, उपाययोजना दुप्पट,स्पीड 30 पर्यंत खाली, सेवा रस्ता, रिंगरोड आणि कारवाई—मोठा सुरक्षा आराखडा जाहीर

पुणे/जिमाका – नवलेपुल येथे झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर रस्ते सुरक्षा ही गंभीर बाब असून यापुढे या परिसरात अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबवाव्यात,असे स्पष्ट निर्देश केंद्रीय नागरी व वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

भारतीय रस्ते कॉग्रेस च्या मार्गदर्शक सूचनांनुसार विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करून समन्वयाने काम करण्यास त्यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
नवलेपुल येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिकेचे महानगरपालिका आयुक्त नवकिशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, पीएमपीएल, महावितरण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोहोळ यांचे निर्देश –
जांभूळवाडी–वारजे रिंगरोडचा डीपीआर गतीने पूर्ण करा.
उन्नत कॅरिडॉरचा डीपीआर मंत्रिमंडळासमोर तातडीने मंजुरीसाठी सादर होणार.
एनएचएआयने जांभूळवाडी–रावेत सेवा रस्ता व अंडरपासची कामे तातडीने पूर्ण करावीत.
वडगाव पुलाचे रुंदीकरण गतीने करावे.
स्पीडगन ३ वरून ६ पर्यंत वाढवाव्यात.
वेगमर्यादा ६० किमी/तास वरून ३० किमी/तास करावी.
जड वाहनांची ओव्हरलोडिंग व तांत्रिक तपासणी खेड शिवापूर टोलनाक्यावर काटेकोरपणे करावी.
उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पुढील टोलनाक्यावर तातडीने दंडात्मक कारवाई.
रस्त्यावर रिफ्लेक्टरची संख्या वाढवावी.
पीएमपीएलने अधिकृत बस थांबे निश्चित करावेत.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठका नियमित घेऊन उपाययोजना राबवाव्यात.
प्रशासनाची प्रतिक्रिया –
मनपा व पीएमआरडीए : सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवून वाहतूक कोंडीवर उपाय.
पोलीस विभाग : वेगमर्यादा उल्लंघनावर विशेष मोहिम, वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना.
रोड सेफ्टी ऑडिट करून अपघाताचे मूळ कारण शोधून शाश्वत उपाययोजना करण्यास विभागीय आयुक्तांची सूचना.
पीएमआरडीए : रिंगरोड व सेवा रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याची ग्वाही.
डिसेंबर महिन्यात या सर्व कामांचा विशेष आढावा घेण्यात येणार असल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली.






