नवले पूल दुर्घटना: डॉ. नीलम गोऱ्हे यांची पीडित कुटुंबीयांना धीर देणारी भेट अपघात पीडितांच्या वस्तूंची चोरी उपसभापतींचा संताप-पोलीस तपासाची मागणी


नवले पुलावर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी केंद्र राज्य सरकारला डॉ. गोऱ्हे यांचे निवेदन

शिवसेनेतर्फे तातडीची आर्थिक मदत; कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू


चोरीच्या धक्कादायक प्रकरणावर कारवाईची मागणी – तातडीच्या उपाययोजना करण्याचा पुनरुच्चार
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १६ नोव्हेंबर २०२५ : पुण्यातील नवले पूल परिसरातील भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे सांत्वन केले.नवलकर व दाभाडे या परस्पर नातेवाईक असलेल्या कुटुंबीयांवर ओढवलेला मोठा आघात पाहून डॉ. गोऱ्हे यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले.
मृतांच्या कागदपत्रांची चोरी- संतापजनक धक्कादायक प्रकरण

कुटुंबीयांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी एक गंभीर बाब उघड केली—
अपघातानंतर काही लोकांनी मृतांचे आधार कार्ड,मोबाईल फोन,दागिने,महत्वाची कागदपत्रे चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. या निकृष्ट कृत्यावर त्यांनी संताप व्यक्त करत पुणे पोलीस आयुक्तांकडे तातडीने तपास व कठोर कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचे स्पष्ट केले.
तातडीची नुकसानभरपाई,पुनर्वसन आणि शासकीय मदतीबाबत निर्देश
या भेटीत त्यांनी स्थानिक प्रशासनालाही उपस्थित राहण्यास सांगितले होते, जेणेकरून कुटुंबीयांना नुकसानभरपाई
पुनर्वसन,शासकीय मदत यांची माहिती तत्काळ मिळू शकेल.मात्र अशा दुर्घटनांमध्ये आर्थिक मदत दु:ख भरून काढू शकत नाही, त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना अनिवार्य आहेत,असे त्यांनी सांगितले.

नवले पुल परिसरात तातडीच्या सुधारणा करण्याची मागणी
डॉ.गोऱ्हे यांनी यापूर्वीच केंद्रीय व राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून, नवले पुल परिसरातील सतत घडणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी उपायांसाठी पुढील बाबी सुचवल्या आहेत-
धोकादायक उतारात त्वरित बदल
पर्यायी वाहतुकीची व्यवस्था
कात्रज बोगद्यापासून उतरणाऱ्या वाहनचालकांसाठी जनजागृती
उतारावर वेग नियंत्रणासाठी तांत्रिक उपाय
जड वाहनांची काटेकोर तपासणी
लवकरच मुंबईत विस्तृत आढावा बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वखर्चातून तातडीची मदत
सरकारची मदत लवकर मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.तरीही आम्ही विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेतर्फे तातडीची आर्थिक मदत स्वतः दिली आहे,असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान निलेश गिरमे (पुणे युवा सेना शहर प्रमुख), निलेश घारे (युवासेना जिल्हा प्रमुख)सोमनाथ कुटे (युवासेना प्रमुख),कार्यकर्ते लोकेश राठोड, हृतिक गलांडे, चेतन कोद्रे तसेच प्रशासनातील मंडळ अधिकारी अर्चना ढेंबरे उपस्थित होते.
सांत्वन भेट
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मृत स्वाती नवलकर यांच्या पती संतोष नवलकर व त्यांच्या मुलांना,मृत दत्ता दाभाडे यांच्या मुलगी कोमल दाभाडे हिला भेटून त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला.त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रत कुटुंबीयांना देऊन, प्रकरणात केंद्र,राज्य व स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.






