आयकॉनिक विक अंतर्गत प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे तर्फे सासवडमध्ये शोभायात्रेचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी शोभायात्रेने सासवड मध्ये भारावलेले वातावरण

आयकॉनिक विक अंतर्गत प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे तर्फे सासवड मध्ये शोभायात्रेचे आयोजन Organizing a procession in Saswad by the Regional Public Relations Bureau, Pune under Iconic Week

रांगोळ्या आणि फुलांनी सासवडकरांनी केले अमृत महोत्सवी शोभायात्रेचे स्वागत

    पुणे, 29 ऑगस्ट 2021,PIB Mumbai - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात दिनांक 23 ते 29 ऑगस्ट हा 'आयकॉनिक विक' म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत देशातील नागरिकांना देखील प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जात आहे.
शोभायात्रेत सारा सासवड सामील

असाच एक भारावलेला कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी पुण्यातील पुरंदर तालुक्यामधील सासवड येथे झाला. प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र-गोवा राज्य), भारत सरकार यांच्यातर्फे आयोजित एकिकृत संपर्क महोत्सवाला सासवडच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी आयोजित शोभायात्रेत सासवड मधील प्रत्येक घर, लहान-थोर सामील झाले होते.

सासवड नगर परिषदेपसून संध्याकाळी चार वाजता निघालेल्या शोभायात्रेत बैलगाड्यांसह शेतकरी-नागरिक सहभागी झाले होते. या बैलगाड्यांवर स्वातंत्र्य सेनानी आणि भारतीय समाज सुधारक यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. तसेच केंद्र सरकारच्या विविध लोकाभिमुख योजना देखील बैलगाड्यांवर झळकत होत्या. सरकारी योजनांचे लाभार्थी या शोभायात्रेत आवर्जून सहभागी झाले होते. सासवडकरांनी दाराशी भारतीय स्वातंत्र्यावर आधारित रांगोळ्यांनी आणि फुलाच्या पाकळ्या उधळून या शोभायात्रेचे स्वागत केले.संपूर्ण शोभायात्रा मार्गावर संस्कार भारतीची रांगोळी रेखाटली जात होती.भारतमाता, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि इतर भारतीय रत्नांच्या वेशभूषेत, नऊवारी साड्या नेसून लहान-थोर या यात्रेत सहभागी झाले होते. हलगी, तुतारी, शाहिर यांच्या आवाजाने आसमंत भारला होता.

 सासवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्य अधिकारी सूर्यकांत पठाडे, गटनेत्या आनंदी जगताप, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे उपसंचालक निखिल देशमुख याप्रसंगी उपस्थित होते.

   शोभायात्रेचा समारोप प्रतिरूप बापू आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाले. यावेळी शाहिर देवानंद माळी आणि सहकलाकारांनी देशभक्तीपर गीते तसेच पोवाडे यांनी उपस्थित नागरिकांना रोमांचित केले.सासवड नगर परिषद, दौंड–पुरंदर उपविभागीय अधिकारी, सासवड ग्रामीण रुग्णालय अधिक्षक,स्व. कमलाबाई माणिकचंद मुथा कन्या प्रशाला, सासवड, सासवड ग्रामीण पोलीस, पुरंदर तालुका शेतकरी संघ, सासवड कृषी विभाग यांचा सक्रीय सहभाग या कार्यक्रमास लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: